संभाजी राजेंच्या मूकमोर्चात प्रकाश आंबेडकरचा सहभाग!

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजी राजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्त्वात उद्यापासून 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळाच्या ठिकाणी पहिले आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटल्याने कोल्हापुरात याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाहू समाधीस्थळाचा परिसर भगवामय झाला असून, आता त्यांच्या या आंदोलनाला आधीच पाठिंबा दिलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आता मोर्चात सहभागी होणार आहेत.

राज्याच्या राजकारणात बदलाची अपेक्षा 

१६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत, असे ट्विट वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत ट्विटरवर केले आहे. आताच्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यामध्ये दोन मार्ग आहे. एक म्हणजे रिव्हूय पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत. तेव्हा राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजी राजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

(हेही वाचा : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’)

दोन्ही राजे आरक्षणासाठी एकत्र!

दरम्यान कालच संभाजी राजेंशी उदयनराजेंची भेट झाली होती. यावेळी उदयन राजेंनी संभाजी राजे छत्रपती यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे घातक राजकारण केले जात आहे. सरकारमध्ये जर धाडस असेल, तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला, तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयन राजे, ना संभाजी राजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केले जाईल, अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. राज्य सरकारला मराठा समाजबांधवांना आरक्षण द्यावे लागणारच आहे. केंद्राकडून आरक्षण मिळवण्याचे आम्ही बघू मात्र, राज्यातील आरक्षणाचा प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवणे गरजेचे आहे. या ठिकाणी राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे घातक राजकारण केले जात आहे, ते त्यांनी करू नये, राज्यकर्त्यांना आडवा आणि गाडा, त्यांना जाब विचारा, असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. पाच बोटे एकसारखे नसतात. सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात कुणी गायकवाड आयोगाचा अहवाल वाचलाच नाही, हे माझे ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवताय?, असा सवालही त्यांनी केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here