तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केले होते. सनातन (Sanatan) धर्म डेंग्यू तापासारखा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही हेच वक्तव्य केले. त्यामुळे आता प्रकाश राज यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकाश राज (Prakash Raj) यांनी कलबुर्गी येथील एका कार्यक्रमादरम्यान उदयनिधी यांच्या विधानाचा पुनरुच्चार करताना म्हटले की, सनातन (Sanatan) हा डेंग्यु तापाप्रमाणे आहे आणि त्याला नष्ट करायला हवे. मुस्लीम वाहकाला टोपी उतरवण्यास सांगणे हे देखील तसेच आहे. सगळ्यांना आपला धर्म आचरणात आणण्याचा अधिकार आहे. या समाजात सगळ्यांना राहायचा अधिकार आहे. धार्मिक यात्रेत जय श्रीराम म्हणत तरुण चाकू आणि तलवारी घेऊन चालतात, हे पाहून मला खूप दुःख होते, त्यांनी स्वतःच्या नोकरी आणि स्वप्नांविषयी विचार करायला हवा. मला आश्चर्य वाटते की कोणी त्यांचा असा ब्रेनवॉश केला आहे. 8 वर्षांच्या मुलाला धर्माशी जोडणे ही कृती सनातन (Sanatan) धर्माशी जोडलेली आहे. हा डेंग्यु तापासारखा आहे, ज्याला नष्ट केले जायला हवे. आपण कोणत्या देशात राहतोय? बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशात अस्पृश्यता अवैध ठरली आहे. पण, लोकांची मानसिकता तशीच आहे, असे प्रकाश राज (Prakash Raj) यावेळी म्हणाले आहेत.
(हेही वाचा G20 घोषणापत्राचे रशियाकडून कौतुक; युक्रेनीकरण होऊ दिले नसल्याबद्दल व्यक्त केले स्वागत)
यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन (Sanatan) धर्माची तुलना डेंग्यु, मलेरिया यांसारख्या आजारांशी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. त्यांनी केलेल्या विधानानुसार, सनातन धर्माचा नुसता विरोध करून चालणार नाही, तर सनातन धर्माला समाप्त करायला हवे. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांना संपवावच लागेल. आपण, डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. आपल्याला त्याला संपवावे लागते, तसेच आपल्याला सनातन (Sanatan) धर्म संपवावा लागेल, असे वक्तव्य उदयनिधी स्टालिन यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. अनेक हिंदु संघटनांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे.