#GoaCM कोकणी भाषेत शपथ घेत ‘प्रमोद सावंत’ सलग दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री!

162

डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली.  दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते.

सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोहळ्याआधी शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी सादर केली. या यादीत वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या नावाचा समावेश आहे. विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : “मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव…” सोमय्यांचा गंभीर आरोप! )

ट्वीटरवर शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांचे सर्व प्रमुख व दिग्गज नेत्यांनी अभिनंदन केले आहे. गोव्यातील लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रमोद सावंत अथक परिश्रम करतील. याची मला खात्री आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत तुम्ही सर्वजण #GoldenGoa साठी कठोर परिश्रम कराल असा विश्वास व्यक्त केला आहे.

शपथविधी सोहळ्याला विलंब

मगोपचे सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे नाव शपथविधी घेणाऱ्या आमदारांच्या यादीतून गायब झाले आहे. या तिघांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु होती. सुदिन ढवळीकरांच्या नावाला अजूनही भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे कॅबिनेटच्या उरलेल्या जागांमध्ये या नावांना संधी मिळणार की भाजप आणखी वेगळी खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे गोव्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. गोवा विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापन केली आहे. भाजपला 3 अपक्ष आमदारांसह मगोपनेही पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ 25 वर पोहोचले आहे.

गोव्यात विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्वच राज्यात एकाच वेळी शपथविधी सोहळा करण्याचे भाजपचे नियोजन होते. परंतु गोव्यात शिगमोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शपथविधीला विलंब झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.