प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय आणि ईडीने सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर छापा टाकल्याचे समजते. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर ईडीने छापा टाकला आहे. हे प्रकरण एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स एक्सचेंज लिमिटेडचे प्रकरण आहे, ज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात बिल्डर योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती. सुमारे 5,500 कोटींच्या सावकारीशी संबंधित हे प्रकरण असून या प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीला चौकशी करायची होती. यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी धक्कादायक माहिती दिली, या प्रकरणी ईडी आणि सीबीआय सरनाईक यांना शोधत आहेत, मात्र सरनाईक सापडत नाहीत, असे म्हटले आहे.

सरनाईक यांना अटक होणार? 

सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने यांनी रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

(हेही वाचा : का केल्या सरनाईकांच्या जमिनी जप्त?)

काय म्हटले आहे किरीट सोमय्या यांनी? 

उद्धव ठाकरे यांचा उजवा हात प्रताप सरनाईक गायब! ७८ एकर टिटवाळ्यातील जमिनीचा घोटाळा, एनएसइएलमधील घोटाळा या प्रकरणी ईडी आणि सीबीआय हे सरनाईक यांचा शोध घेत आहेत.

गेल्यावर्षीही टाकलेली धाड!

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here