एकनाथ शिंदेंचे ठरले; प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?

ठाण्याच्या ओवळा-माजीवडा मतदारसंघातील विकासकामांसाठी एकाच टप्प्यात तब्बल ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यानिमित्ताने प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा सलगी झाल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र, या निर्णयाआडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबत चालल्याने आमदारांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे-फडणवीसांनी संभाव्य मंत्र्यांची प्रारूप यादी निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
संजय शिरसाट, भरत गोगावले, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह ठाण्यातील प्रताप सरनाईक त्यात आघाडीवर आहेत. मात्र, सरनाईक यांच्या भोवतालचा ईडीचा फेरा अद्याप सुटलेला नसल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेऊन विरोधकांच्या हाती आयते कोलीत देण्यास शिंदेंसह फडणवीसही इच्छुक नाहीत. त्यामुळे मंत्रिपदाऐवजी मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यांची मनधरणी करण्यात आल्याचे कळते.

एका दगडात दोन पक्षी

  •  प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कापल्याने ते ठाण्याच्या पालकमंत्री पदावर दावा सांगू शकणार नाहीत. सध्या शंभूराज देसाई यांच्याकडे साताऱ्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्याकडचा अतिरिक्त भार काढला जाईल.
  • ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईक आग्रही होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बालेकिल्ल्याचा कारभार त्यांच्या हातात देण्यास अजिबात इच्छुक नव्हते. त्यामुळे सरनाईकांचे मंत्रिपद कापून शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here