संकटात महाविकास पाठीशी राहिली नाही! सरनाईकांनी ‘त्या’ पत्रामागील मांडली व्यथा

भाजप-सेनेची युती तुटायची वेळ होती. त्यावेळी मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर मीडियाने मला काही प्रश्न केले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी मी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला मांडला होता. अन्वय नाईक प्रकरण उकरून काढले, म्हणून आपल्याला लक्ष्य केले, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

88

मी महाविकास आघाडीच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी होतो, त्यानंतर सरकारची बाजी प्रखरपणे मांडू लागलो. त्यामुळे माझ्यामागे तपासाचा ससेमिरा लावला. माझ्यावर ह्र्दयविकाराची शस्त्रक्रिया केली. माझी पत्नी कर्करोगाने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत माझ्यावर संकट आले, तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असा खुलासा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानभवन परिसरात केला. त्यामुळे सरनाईकांच्या पत्राचा विविध अर्थ काढला जात होता, आता सरनाईक यांनी स्वतःच त्याचा अर्थ सांगितला.

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे या अधिवेशनात प्रताप सरनाईक येणार की नाही? अशी चर्चा रंगली होती. परंतु अनेक दिवस गयाब असलेले सरनाईक विधानभवन परिसरात आले आणि माध्यमांसमोर येऊन स्वतःची भूमिका मांडली. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभे राहायला हवे होते. पण तसे झाले नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले.  त्यामुळे मी चुकीचे काही केले असे वाटत नाही, असे सरनाईक म्हणाले.

(हेही वाचा : सरकारने लोकशाहीला कुलूप लावले! देवेंद्र फडणवीस आक्रमक)

सोमय्यांचा माझ्यावर राग! 

माझ्या पक्षाच्या प्रतोदाने व्हीप बजावला. त्यामुळे अधिवेशनाला आलो आहे. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिले आहे, असे सांगतानाच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असेही सरनाईक म्हणाले. गेल्या अधिवेशनात किरीट सोमय्या यांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या यांच्या कुटुंबीयांनी मीरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीपरणे अनधिकृत बांधकामे केल्याचे प्रकरण मी उघड केले. त्यामुळे सोमय्यांनी माझ्याविरोधात आंदोलन केले, असा आरोप यांनी केला.

म्हणून आपल्यामागे ईडीची चौकाशी लावली! 

भाजप-सेनेची युती तुटायची वेळ होती. त्यावेळी मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर मीडियाने मला काही प्रश्न केले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी मी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला मांडला होता. अन्वय नाईक प्रकरण उकरून काढले. विधीमंडळात आवाज उठवला. कंगना राणावत हिने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले म्हणून तिच्याविरोधात हक्कभंग दाखल केला. त्यामुळे मी विरोधकांसाठी लक्ष्य बनलो, माझ्यामागे ईडी लावण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार! अजित पवारांची घोषणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.