राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फक्त सनसनाटी निर्माण करून मूळ विषयाकडून विचलित करण्याचा उद्देशाने ते तथ्यहीन आरोप करत आहे. सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी या देशातील उत्तम तपास यंत्रणा आहेत. पण नवाब मलिक यांना या तपास यंत्रणापेक्षा जास्त ज्ञान असेल व कायद्याची माहिती असेल तर त्यांनी आपल्याकडील माहिती कायद्याच्या चौकटीत सांगावी, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ११ जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना सोडण्यात आले. या तिघांना का सोडण्यात आलं?, रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, या प्रकरणामध्ये जर एनसीबीने कोणाला सोडल्याचा मलिक यांचा दावा असेल तर तो तपासून पाहिला पाहिजे, कारण कायदा हा सर्वांना समान आहे मग तो कोणीही असो वा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. पण केवळ बिनबुडाचे आरोप करु नये. राज्याचे गृहमंत्री तुमचेच आहेत, त्यामुळे मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस यांच्या मार्फत संबंधितांचे मोबाईल कॉल तपासणं, अन्य माहिती घेण हे आपल्या सरकारला नियमानुसार करता येईल. परंतु माहिती न घेता केवळ अंधारात बाण मारण्याचा केविलवाणा प्रयत्न मलिक करत असल्याची टीका दरेकर यांनी केली.
(हेही वाचा : क्रूझवरून सोडून दिलेला ‘तो’ मेव्हणा मोहित भारती यांचा!)
…तर नवाब मलिकांना जबाबदार धरायचे का?
भाजपच्या नेत्याचा मेहुणा यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. विनाकारण भाजपवर दोषारोप होत आहे. परंतु त्याचे आरोप अजून सिद्ध व्हायचे आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला थेट एनसीबीने अटक केली आहे. मग याचा दोष आम्ही सासरे नवाब मलिक यांना द्यायचा का? त्यांना दोषी धरायचं का?, असा सवाल करताना दरेकर म्हणाले की, जसे आपण मोहित भारतीयच्या मेहुण्यावरून भाजपला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करत आहात मग आपल्या जावयाच्या अटेकसाठी आम्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीला जबाबदार धरायच का ? ह्याचे उत्तरही नवाब मलिक यांनी द्यावं असेही त्यांनी स्पष्ट केले.
मलिक कोणाला वाचवत आहेत?
मंत्री नवाब मलिक जनतेला मूळ विषयांपासून विचलित करत आहेत. एनसीबीने ड्रग्स पार्टी प्रकरणात अनेक तरुणांना पकडलं आहे. या प्रकरणावरून नवी पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याला चाप बसवण्यासाठी अशी कारवाई अत्यंत महत्वाची आहे. परंतु कोणाला तरी वाचवण्यासाठी व सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न नवाब मलिक करीत आहेत असा आरोप करताना दरेकर यांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही. न्यायालयावरही विश्वास नाही. आमचा जनतेच्या न्यायालयावर विश्वास आहे त्यामुळे या सर्वांवरून असे दिसून येते की, मलिक केवळ रोज सनसनाटी आरोप करीत आहेत.
(हेही वाचा : ड्रग्स पार्टीत पार्थ पवार? एनसीबी म्हणते ‘चौकशी सुरु आहे!’)
भाजपला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न
नार्कोटिक्स सेलमध्ये ज्यांच्यावर आपल्याला संशय आहे, त्याबाबत आपण माहिती काढू शकता. परंतु मलिक यांच्या जावयाला अटक केल्यापासून एनसीबीच्या संदर्भात ते अनेक तथ्यहीन वक्तव्ये प्रसार माध्यमातून करत आहेत. आपल्या जावयाला अटक झाल्यानंतर मोहित भारती यांच्या मेहुण्याचे नाव घेऊन विनाकारण भाजपला बदनाम करण्याचा मलिक यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
Join Our WhatsApp Community