आधी चोर्‍या, आता बहाणे! दरेकरांचे मलिकांना उत्तर

111

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा प्रकार आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

नोटीस आली की बिळात लपायचे

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः राज्यात ईडीच्या वाढत्या कारवायांवर काय म्हणाले शरद पवार? वाचा…)

शिवसेनेला आमच्या शुभेच्छा

असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरुदं ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी 36 नगरसेवकांपैकी 23 मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करुन सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करुन शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.