तर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या, दरेकरांचे राऊतांना खुले आव्हान!

आमची एकदा नाही तर हजार वेळा चौकशी करा. पण विषय समजून न घेता ट्वीट केले जात आहे, देवेंद्रजी आणि प्रविण दरेकर पोलिस स्टेशनला गेले याची चौकशी सरकार करणार का?

आम्ही रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहोत, असं सरकारला वाटत असेल तर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या, असे खुले आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले आहे. संजय राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत भाजपने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, पण श्रेयासाठी हे सर्व घडवून आणले, असा आरोप केला होता, त्याबाबत दरेकर आज माध्यमांशी बोलत होते.

सरकारमधील मंत्र्यांनाच मुख्यमंत्री वेळ देत नाहीत

आपण हा सर्व घटनाक्रम बघा, मी दमणला गेल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेजी यांना फोन केला आणि त्यांना आश्वस्त केलं की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून महाराष्ट्रासाठी या कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळू शकतात. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांशी बोललो, अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी आणि या विभागाच्या सचिवांशी बोललो, सरकारच्या सर्व प्रमुख लोकांशी बोललो. मंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यांनीच अनुकूलता दाखवली. मात्र, नंतर याबाबत राजकारण केलं गेलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला संजय राऊत यांनीच आम्हाला वेळ घेऊन द्यावी. कारण, सव्वा वर्षात मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना केवळ दोन वेळा बैठकीच्या निमित्ताने भेटले. ज्या गोष्टी सुचवल्या त्यामधील एकही गोष्ट त्यांनी केली नाही. त्यांच्याच सरकारमधील आरोग्य मंत्र्यांची ही खंत आहे की, त्यांनाही चर्चेसाठी वेळ मिळत नाही. त्यांना जे निर्णय अपेक्षित आहेत, ते त्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचेच हे दुःख असल्यामुळे आणि आम्ही सरकारमधील सर्वांशी चर्चा, बैठका घेतल्या असल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांचे राजकारण बालीश! ‘या’ भाजप नेत्याची टीका!)

दिल्लीच्या नाकात नळकांड्या घालू नका

संजय राऊत यांनी सामनामध्ये चितेचा उल्लेख केला आहे. त्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले, महाराष्ट्रातील जनता आज रोज चितेवर जात आहे. त्या चितेची चिंता खरं तर राऊतांनी करायला हवी, दिल्लीच्या नाकात नळकांड्या घालण्यापेक्षा राज्यातील गोरगरीब लोकांना ऑक्सिजन, इंजेक्शन नाही, त्यासाठी काही तरी मेहनत करायला हवी. कदाचित राजकीय टीका करुन त्यांना समाधान मिळेल, पण त्यामुळे कोरोनाग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा सल्लाही दरेकर यांनी राऊत यांना दिला.

सरकारचा अहंकार आडवा येतो

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस स्टेशनला जायला नको होते, त्यांनी तो साठा सरकारला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली आहे, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यावर दरेकर म्हणाले, या सरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखी आहेत. थोरात साहेबाना इंजेक्शनचे नाव देखील नीट घेता येत नाही, त्यांनी नीट माहिती करुन घ्यावी असे दरेकर यांनी सांगितले. साठा जर असेल तर तो जप्त करायला सरकारला कुणी अडवलं आहे. माझ्याकडे पोलिस खात्याची प्रेस नोट आहे, डीसीपी(ऑपरेशन) यांनी काढलेली आहे. त्यामध्ये साठ्याचा कुठेही उल्लेख नाही, केवळ सर्वसाधारण चौकशीसाठी त्यांना आणण्यात आले होते, असे त्यात म्हटले आहे. या मधूनही काही प्रश्न निर्माण होतात. एकाच कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी का आणलं, बाकीच्या कंपन्यांना का आणलं नाही. 60 हजार इंजेक्शनचा साठा आहे, असं जर मंत्र्यांचं म्हणणं असेल तर त्यांना जेलमध्ये टाका, कारवाई करा आणि तो साठा राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करुन द्या. या सरकारचा बोगसपणा उघड झालेला आहे. आम्ही सरकारला मदत करायला तयार असताना सरकारचा अहंकार आडवा आला. देवेंद्रजी यांना क्रेडिट मिळेल आणि आमची नाचक्की होईल, या भावनेतून हे सर्व राजकारण सरकार करत आहे.

(हेही वाचाः काका-पुतण्यांचे ‘हे’ शिलेदार भाजपच्या रडारवर!)

या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यावीत

ज्याठिकाणी सरकार निष्प्रभ ठरते, औषधं आणू शकत नाही, जे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अडवतात त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. रोज अनेक आमदार, खासदार पोलिस स्टेशनला जात असतात, विरोधी पक्ष नेते गेले तर यांच्या पोटात का दुखत आहे? हे सरकार उघडे पडले आहे, वैफल्यातून ही वक्तव्ये येत आहेत. जेवढा वेळ केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे सरकार घालवत आहे, त्याऐवजी 5 मिनिटे मुख्यमंत्र्यांनी, आरोग्य किंवा अन्न व औषध मंत्र्यांनी किंवा संजय राऊत यांनी मीडियासमोर यावे आणि बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शन किती आहेत, कुठे आहेत, कुणाशी लोकांनी संपर्क साधावा, हे एकदा स्पष्ट करावे, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली.

साठा लवकरात लवकर जप्त करा

रेमडेसिवीर इंजेक्शन साठा, विरोधी पक्षाने पोलिस स्टेशनला दिलेली भेट यासंदर्भात चौकशीचे संकेत सरकारमधील लोकांनी दिले. आमची एकदा नाही तर हजार वेळा चौकशी करा. पण विषय समजून न घेता ट्वीट केले जात आहे, देवेंद्रजी आणि प्रविण दरेकर पोलिस स्टेशनला गेले याची चौकशी सरकार करणार का? साठा मिळाला असेल तर चौकशीला कुणी अडवलं आहे? आमची तीच विनंती आहे की, हा साठा लवकर जप्त करा, काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा आणि तो साठा जनतेला उपलब्ध करुन द्या, असे प्रविण दरेकर म्हणाले.

(हेही वाचाः देशात युद्धसदृश परिस्थिती; संसदेचे तातडीने अधिवेशन बोलवा! संजय राऊतांची मागणी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here