- प्रतिनिधी
विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पहिले पाऊल टाकणाऱ्या महाराष्ट्राला तब्बल दहा वर्षे मागे नेऊन विकासाची वाट रोखणारे महाविकास आघाडी सरकार व नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झालेले उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भाजपाने जंग पुकारला असून महाराष्ट्रद्रोही, विकासद्रोही, शेतकरीविरोधी, महिला व युवकविरोधी, बाळासाहेबांचे हिंदुत्व खुंटीवर टांगून काँग्रेसचा लाळघोटेपणा करणारे धर्मद्रोही ठाकरे यांच्यावर प्रदेश भाजपातर्फे दररोज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे भाजपाचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची मंगळवारी (५ नोव्हेंबर) ठाणे येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला भाजपा आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघेला, महिला जिल्हा अध्यक्षा मृणाल पेंडसे, मीडिया सेंटरचे सागर भदे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत संबोधित करताना प्रविण दरेकर म्हणाले कि, स्वतःचे कोणतेच कर्तृत्व नसणारे, निवडणूकदेखील लढवू न शकणारे उद्धव ठाकरे आपण आग्रह केल्यामुळे मुख्यमंत्री झाले, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला होता. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही, बाळासाहेबांचा पुत्र नसतो, तर मला काडीचीही किंमत नाही असे सांगून तशी कबुलीच दिली होती. मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेल्या ठाकरे यांनी शिवसैनिकास मुख्यमंत्री करण्याऐवजी स्वतःच पदावर बसले आणि आपल्या कृतीचे समर्थन करण्याकरिता शाब्दिक कसरती सुरू केल्या. महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आघाडीचा सत्ताकाळ अडीच वर्षातच आटोपला अन्यथा महाराष्ट्र लयास गेला असता. सत्तेवर येताच विकासाचे प्रकल्प बंद करणारा पहिला मुख्यमंत्री असेच ठाकरे यांचे वर्णन करावे लागेल. या सत्ताकाळात राज्याच्या हिताचे एखादे तरी दखल घेण्याजोगे काम केल्याचे उद्धव ठाकरे यांनी दाखवून द्यावे, असे आव्हानही यावेळी दरेकरांनी (Pravin Darekar) दिले.
(हेही वाचा – मुलांना मोफत शिक्षण, ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर, महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणी; Uddhav Thackeray यांची आश्वासनांची खैरात)
दरेकर पुढे म्हणाले की, मुस्लिम लांगूलचालनासाठी वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात दंड थोपटत ज्यांनी आपल्या वडिलांच्या हिंदुत्वाला तिलांजली देऊन दिवाळी साजरी करण्यासही विरोध केला, ते उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेशी कसे प्रामाणिक राहणार ? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने महाराष्ट्राचा विकास रोखला, महामार्ग बांधणे थांबविले, मेट्रो रेल्वेच्या कामास स्थगिती दिली, महाराष्ट्रातील उद्योगांचा मार्ग रोखला, करोना काळात आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करूनही संकटग्रस्त जनतेच्या तोंडाला पाने पुसली, कोविड काळात बॉडी बॅग, खिचडी, कोविड सेंटर, औषध खरेदी कंत्राट अशा अनेक घोटाळ्यांना संरक्षण दिले. अशा प्रत्येक घोटाळ्याचा पंचनामा आगामी काळात करण्यात येणार असून अशा भ्रष्ट नेत्यांना राजकारणातून हद्दपार करण्याच्या महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयास समर्थन देण्यासाठी ठाकरेविरोधी महासंग्रामाचे रणशिंग फुंकण्याचा भाजपचा निर्धार असल्याचे दरेकरांनी (Pravin Darekar) यावेळी जाहीर केले.
दरेकर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली आणि सर्वच क्षेत्रांत राज्याची पीछेहाट झाली. मुंबईतील आरे-कुलाबा मेट्रो प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प थांबविल्यामुळे मविआ सरकारने राज्याचे १४ हजार कोटींचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले, अन्य अनेक जनहिताचे प्रकल्प रोखल्याने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि गरीब जनता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिली. मुंबईचा किनारी मार्ग, अटल सेतू, मेट्रो, नवा विमानतळ, झोपडपट्टी योजना, अशा अनेक सुविधा महायुती सरकारने पुढे राबविल्या आणि बिघडलेला महाराष्ट्राचा मार्ग रुळावर आणला. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या जनहिताच्या आणि राज्यहिताच्या एका तरी कामाचा दाखला द्यावा. ठाकरे सरकारने प्रकल्प रोखले, आणि महायुती सरकारने त्यांना गती दिली.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : दापोली तालुक्यात ‘रायगड पॅटर्न’; एकाच वेळी ६ कदम निवडणुकीच्या रिंगणात)
राज्याच्या विकासाचा विनाश करणाऱ्या अभद्र आघाडीला जनतेने नाकारलेय
दरेकर म्हणाले की, सरकारने ठरविले, तर विकासाचे शानदार उपक्रम सरकार राबवू शकते, हे महायुती सरकारने सिद्ध केले आहे. विकासासोबत समाजजीवनाचा स्तर उंचावण्याच्या योजनाही राबविण्याची गरज ओळखून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी अशा अनेक घटकांसाठी महायुती सरकारने आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे. पटोले-पवार-ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आपल्या सत्ताकाळात अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासने दिली. पण त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकही घोषणा अमलात आणली नाही. त्यांच्याच सत्ताकाळात एसटी कर्मचाऱ्यांची परवड झाली, वेतनही न मिळाल्याने १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, एमपीएससी परीक्षार्थींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडले. याउलट महायुती सरकारने गेल्या सव्वादोन वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा प्रगती पुस्तकाद्वारे महाराष्ट्रासमोर मांडला असून सामाजिक, औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांमुळे राज्याचा बदललेला चेहरामोहरा जनतेसमोर आहे. (Pravin Darekar)
(हेही वाचा – Canada Hindu Temple : कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; कॅनडा सरकारची कारवाई)
जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करेल
विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांना करायचा आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या अडीच वर्षांत जनतेने स्थगितीचा अनुभव घेतला व अलीकडच्या अडीच वर्षांत वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतला. त्यामुळे निर्णय करणे आता सोपे झाले असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community