- प्रतिनिधी
संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच्या अस्ताबाबत विचार करावा. कुणाचा उदय होतोय हे पाहण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचा अस्त होतोय याची काळजी करावी, अशी तीव्र टीका भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. राऊत हे केवळ बोलघेवडेपणा करू शकतात, पण कुठलेही रचनात्मक आणि विकासात्मक काम त्यांच्या हातून होत नाही, असा आरोप दरेकरांनी केला.
महाविकास आघाडीवर निशाणा
पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी (Pravin Darekar) राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, “महायुतीचे नेतृत्व सक्षम आहे. काही मतभेद किंवा मनभेद निर्माण झाले, तरी ते आम्ही एकत्रित बसून सोडवू. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व महायुतीतील नेत्यांची आहे.”
महाविकास आघाडीच्या विस्कळीत स्थितीकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “संजय राऊतांनी दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षाचे भवितव्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. महाविकास आघाडीला सध्या एका सुरात काम करता येत नाही, त्यामुळे त्यांना त्यावर काम करावे लागेल.”
(हेही वाचा – पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८५व्या अखिल भारतीय परिषदेनिमित्त विधानपरिषद उपसभापती Dr. Neelam Gorhe बिहार दौऱ्यावर)
पालकमंत्री पदावरून मतभेद
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याच्या प्रश्नावर दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, “अनेक पक्षांचे सरकार असल्यास मंत्री किंवा पालकमंत्री पदाचे वाटप करणे जिकिरीचे असते. प्रत्येक पक्षाला न्याय द्यावा लागतो. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना सुवर्णमध्य काढून निर्णय घ्यावे लागतात.”
ते पुढे म्हणाले की, “महायुतीला लोकांनी बहुमत दिले आहे. मंत्री किंवा पालकमंत्री कोण होणार, यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे कार्य महत्त्वाचे आहे. विसंवादाची चर्चा रस्त्यावर न करता पक्षाच्या चार भिंतीत हा विषय सोडवायला हवा.”
नाराजी आणि समन्वयाचा मुद्दा
मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी निर्माण होण्याच्या चर्चेवर दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “मंत्रीपद किंवा हवे तसे खाते न मिळाल्याने नाराजी होणे स्वाभाविक आहे. पण महायुतीच्या सदस्यांनी एकत्र राहून जनतेची सेवा करण्यावर भर द्यावा.”
पंकजा मुंडे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ आणि परिपक्व नेत्या आहेत. कोणीही नाराज राहणार नाही. महायुतीचा स्थैर्य आणि जनतेची सेवा या दोन गोष्टी सर्वोच्च प्राधान्याच्या आहेत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community