देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सर्वत्र अशा प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून, जनतेच्या मनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्वास आहे, असे मत यावेळी दरेकर यांनी व्यक्त केले.
या शिबिराला भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, मागाठाणे विधानसभा अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला उपाध्यक्षा रश्मी भोसले, माजी नगरसेविका प्रीतम पंडागळे, चित्रपट सेनेच्या निशा परुळेकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, आज संपूर्ण राज्यभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा दिन साजरा केला जात आहे. नेत्यांचा वाढदिवस म्हणजे मोठमोठे बॅनर, वर्तमानपत्रात-टीव्हीवर जाहिरात, यापद्धतीने साजरा केला जातो. परंतु आपले नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले माझ्या वाढदिवसानिमित्ताने जाहिराती देऊ नये, बॅनर लावू नये. सेवाभावी भावनेतून लोकांसाठी सेवाभावी उपक्रम झाले पाहिजेत, अशा प्रकारचा संदेश दिला. आज संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहेत, हेच आपल्या नेत्याचे मोठेपण आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, एका बाजूला लोकांना पब्लिसिटीची हाव असते, परंतु दुसऱ्या बाजूला माझ्या कार्यकर्त्याने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांची सेवा केली पाहिजे हा गुण आपल्या नेतृत्वात आहे. आपले कुटुंबप्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेला हा आदर्श आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना मी प्रधानसेवक आहे. सेवा परम धर्म, हा विचार त्यांनी आपल्याला दिला आहे.
(हेही वाचा – Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे घेणार मुलांमधील शिक्षणाचा कल)
मी ज्या-ज्या ठिकाणी जातो तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी लोकांच्या मनात विश्वास दिसत आहे. राज्यात असा एकही घटक नाही, की त्या घटकाला आपण काही दिले नाही. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. परंतु सर्वात लोकप्रिय नेता कोणी असेल, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र काम करत आहेत व जनतेला खऱ्या अर्थाने विश्वास आणि विकास देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दरेकर म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरेकरांच्या हस्ते वरळी येथे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, पोलीस कॅम्पमधील नागरिकांना छत्री वाटप आणि धारावी येथील नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.
आमचा नेता कर्तृत्ववान
दरेकर म्हणाले की, मला माध्यमांनी विचारले ‘वर्षा’ बाहेर अजितदादा पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. मी म्हटले माणूस पदाने नाही तर कर्तृत्वाने मोठा होत असतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. परंतु त्या सर्वांना बरोबर आणणारा कर्तृत्ववान नेता देवेंद्र फडणवीस आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community