हा सरकारचा निव्वळ कृतघ्नपणा… दरेकरांचा घणाघात!

एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकतात त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलून नेतात, हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे?

82

दुपारी मंत्री दम भरतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं, असले प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहेत. संकट काळात महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या माध्यमातून मदतीची तयारी दर्शवणाऱ्या कंपनीच्या मालकाला दहशतवाद्याप्रमाणे ताब्यात घेणं, हा सरकारचा निव्वळ कृतघ्नपणा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

हे कोणते विकृत राजकारण?

प्रविण दरेकर यांनी रविवारी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून दुपारी ब्रुक कंपनीच्या मालकाला दम भरला जातो, त्यानंतर संध्याकाळी १० ते १५ पोलिस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकतात त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलून नेतात, हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

(हेही वाचाः आता शिवसेनेचे हे ‘संजय’ भाजपच्या रडारवर… नितेश राणेंनी केला आक्रमक शैलीत प्रहार!)

काय म्हणाले दरेकर?

१२ एप्रिल रोजी मी आणि आमदार प्रसाद लाड आम्ही दमणच्या कंपनीत महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता. शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. “तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिवीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत”, असा सवाल त्यांनी डोकानिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलिस डोकानिया यांच्या घरी धडकले, त्यांनी डोकानिया यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांना उचलून पोलिस स्टेशनला नेले. महाराष्ट्राला मदत करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची अशाप्रकारे चौकशी करणं, महाविकास आघाडी सरकारला शोभत नाही. संकटाच्या काळात देखील महाविकास आघाडी सरकारला राजकारण सुचतंय हे दुर्दैवी आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.