सर्वसामांन्यांना त्रास झाला तर आम्ही खपवून घेणार नाही… काय म्हणाले दरेकर?

वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असे परखड मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

135

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?, “महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा सरकारकडून घोषणा केल्या जातात. कोरोनाच्या बाबतीत ही घोषणाबाजी लागू आहे का? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुन्हा टाळेबंदी करुन सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? समोर खड्डा आहे हे कळत असून पुन्हा खड्यात जाण्याची इच्छा आहे का? अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करुन, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भारतीय जनता पक्षातर्फे आज पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी दरेकर माध्यमांशी बोलत होते.

देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार

लॉकडाऊनच्या संदर्भात पक्षाची भूमिका मांडताना दरेकर यांनी सांगितले की, सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यवसाय करणारे, तसेच कष्ट करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करावेत. ताळेबंदी सुसह्य करावी आणि मगच ती लावावी.  कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील  लॉकडाऊनची आवश्यकता नाही, आवश्यकता असेल तर कष्टकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करावेत, अशीच भूमिका घेतली आहे. त्यांनी अशीही टीका केली की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व राज्य सरकार जबाबदार आहे.  राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असे परखड मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः उद्धवसाहेब हाच का तुमचा सोशल डिस्टंन्सिंगचा ‘आदर्श’?)

त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर आणणाऱ्या घटना रोज समोर येत आहेत. नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.  त्यापूर्वी मी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेड्स, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिले होते. दौऱ्यावरुन परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सुद्धा कल्पना दिली होती. पण सांगूनही हे सरकार, प्रशासन जागं होत नाही.  त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध व खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहीजे, अशी मागणी दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील कोरोना रोखण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा

केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलं. केंद्र सरकारने सर्वोपरी राज्याला मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरलं आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत, म्हणून धूळ खात पडले आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कारण सर्वसामान्य लोकांकडे, महाराष्ट्राकडे राज्याच्या सरकारचे लक्ष राहिलेलं नाही, फक्त सत्ता टिकवणे हेच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून मोठ्या प्रमाणावर मदत करावी, अशी मागणीही शेवटी दरेकर यांनी केली.

(हेही वाचाः राज्यात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, सरकारसह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.