देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ, भावूक होत द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन्…”

145

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै, सोमवारी राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हा शपथ विधी सोहळा सकाळी साडे दहा वाजता संसद भवनात झाला. यावेळी भारताचे सरन्यायधीश रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना ही शपथ दिली असून त्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. यावेळी शपथ घेताना द्रौपदी मुर्मू या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं अभिभाषण करताना भावूक होऊन त्या म्हणाल्या, भारत देशात गरीबदेखील स्वप्न पाहू शकतो आणि ते पूर्णही करू शकतो. पुढे त्या असेही म्हणाल्या की, स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत काळादरम्यान वेगाने काम करावे लागणार आहे.

… पण देशाच्या लोकशाहीनेच मला इथपर्यंत पोहोचवले

द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्यावर सांगितले की, मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे, जिचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. स्वतंत्र भारतातील नागरिकांसह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न वाढवायचे आहेत. तर माझा जन्म ओडिशातील लहानशा आदिवासी गावात झाला असला तरी पण देशाच्या लोकशाहीनेच मला इथपर्यंत पोहोचवले.

आपल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. आपल्या पहिल्याच अभिभाषणात त्यांनी वैभवशाली आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे आवाहन केले. जे विकासापासून दूर राहिले. ते दलित आणि आदिवासी हे माझ्यात त्यांचं प्रतिबिंब पाहू शकतात. देशहित माझ्यासाठी सर्वोपरी असणार असून समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. पूर्ण निष्ठेने आणि पुढील काळात जलद गतीने काम करणार असल्याचं सांगत असताना त्यांनी कोरोना महामारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

संसदेत नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या शपथ विधी सोहळ्याला अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारी नागरी आणि लष्करी अधिकारी प्रमुख समारंभास उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.