राजभवनात नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हाॅलचं उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी राष्ट्रपतींनी केलेलं भाषण विशेष होतं. या भाषणात राष्ट्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत गोडवा आहे, एक आपलेपणा आहे म्हणून मी दरवेळी इथे येतो, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलं आहे.
देशातील एक महान राज्य
माझ्या आतापर्यंतच्या साडे चार वर्षांच्या कालावधीत मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो आहे. तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना जर कोणी महाराष्ट्राच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल वा नावाचा अर्थ विचारला, तर तुम्हाला विज्ञान वा इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही. तुमचं हदयचं तुम्हाला उत्तर देईल की, आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र या देशाचं एक महान राज्य आहे, असं म्हणत राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या नावाचं वैशिष्ट्य सांगितलं.महाराष्ट्राच्या महानतेचे इतके आयाम आहेत की, त्याचं कितीही वर्णन केलं तरी ते कमीच आहे. केवळ महाराष्ट्राच्या विविध महान लोकांची नाव जरी घेतली, तरी यादी कमी पडेल. महाराष्ट्राच्या या महान व्यक्तींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि डाॅ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या महान व्यक्तींमुळे महाराष्ट्राच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसतो. या सगळ्या व्यक्तीमत्त्वांचा उद्देश मानवधर्मात उंच स्थान मिळवणंच राहिला आहे, असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं.
म्हणून महाराष्ट्रात यावस वाटतं
महाराष्ट्र अध्यात्माची भूमी आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणा-या विरतापूर्ण संघर्षाची भूमीसुद्धा आहे. देशभक्त तसेच भागवत भक्तांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. हे राज्य भारताचं प्रमुख आर्थिक केंद्र तर आहेच, पण सांस्कृतिक केंद्रसुद्धा आहे, या शब्दांत राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं. अजंठा-वेरुळची लेणी असो किंवा पश्चिमी घाटातील प्राकृतिक सौंदर्य. महाराष्ट्रात प्रतिभा आणि प्रकृती यांचं वरदान लाभलं आहे. महाराष्ट्रातील लोकांचं आतिथ्यसुद्धा प्रसिद्ध आहे. या अशा अनेक विशेषतांमुळे फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर देश विदेशातील असंख्य लोकांना महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटते, असं म्हणत त्यांनी मी अनेकदा महाराष्ट्राला भेट दिल्याचं सांगितलं.
लता दिदींच संगीत अमर
यावेळी मी येथे आल्यानंतर, मात्र या हवेत थोडी उदासिनता जाणवत आहे. कारण, आठवड्याभरापूर्वीच भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्यांच्यासारखी महान प्रतिभा युगातून एकदाच जन्म घेते. लता दिदींचं संगीत अमर आहे. जे सदैव सर्व संगीत प्रेमींना दशकांपर्यत मंत्रमुग्ध करत राहील. सोबतच त्यांचा साधेपणा अनेक लोकांच्या मनावर राहणार आहे. मला अनेकदा व्यक्तीगतरित्या त्यांना भेटण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, अस राष्ट्रपची यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: चक्क रामदास आठवलेंनी शशी थरूरांची घेतली ‘शाळा’ )
महाराष्ट्राचं अभिनंदन करतो
देश 75 वा अमृत महोत्सव देश साजरा करत असताना, मला राजभवनातील या दरबार हाॅलचे उद्घाटन करताना, मला आनंद होत आहे. जुन्या वास्तूची विशेषता टिकवून हे नवं बांधकाम करण्यात आलं आहे. हे ऐकून मला आनंद होत आहे. परंपरा लक्षात ठेवून, तसंच वेळेच भान ठेवत ही वास्तू उभारण्यात आली आहे. नव्या आधुनिक सुविधांनी युक्त अशा या हाॅलच्या उभारणीकरता मी राज्यपाल, तसेच महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. या राजभवनाचा इतिहास भलेही ब्रिटीश काळातला असेल, पण या राजभवनाचा वर्तमान आणि भविष्यकाळ मात्र भारताचा असणार आहे. असं या कार्यक्रमावेळी राष्ट्रपतींनी सांगितलं.
Join Our WhatsApp Community