एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा यांच्यामध्ये सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावणा-या काॅंग्रेसच्या नितीन राऊन यांचे मत बाद करा, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे. माझा नंबर आधी असताना, नितीन राऊत यांनी मतदान केले असा, आक्षेप लोणीकरांनी घेतला आहे.
काय म्हणाले लोणीकर?
लोणीकर म्हणाले की, माझा नंबर पहिला होता. एक तास रांगेत उभा राहिलो. नितीन राऊत हे अर्धा तास मध्ये जाऊन बसले. माझं मतदान पहिलं असताना राऊत यांनी पहिलं मतदान केलं. त्यांना मध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळे त्यांचे मतदान रद्द करण्यात यावे, अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे, असे लोणीकर म्हणाले. या संदर्भातील व्हिडीओ फुटेजदेखील आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: बेस्ट कंत्राटी कामगारांचे आंदोलन )
आयोग काय निर्णय घेणार
भाजपच्या आमदारांनी साडेनऊ वाजल्यापासून मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती. राऊत यांनी रांगेत मतदान न केल्याचा आरोप लोणीकरांकडून करण्यात आला आहे. यावर आता आयोग काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community