राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर आला आता देशात लागलीच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. लागलीच टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देशातील भाजपविरोधी सर्व पक्षांना दिल्लीत संयुक्त बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र शिवसेना या बैठकीला उपस्थित राहणार नाही.
काँग्रेसचीही त्याच दिवशी बैठक
१५ जून रोजी दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण राहील? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आप नेते खासदार संजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. याचवेळी ममता यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपाविरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची १५ जून रोजी होणारी बैठक आधीच ठरलेली आहे, असे येचुरी यांनी म्हटले आहे.
म्हणून शिवसेना गैरहजर राहणार!
ममता बॅनर्जी यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे. परंतू आम्ही तेव्हा अयोध्येमध्ये असणार आहोत. त्यामुळे या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपण स्वतः उपस्थित राहू शकणार नाही. या बैठकीला आमचा एक ज्येष्ठ नेता पाठवू, असे राऊत म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community