राष्ट्रपती निवडणूक : मतपेटीच्या वाहतुकीसाठी विधानभवन ते मुंबई विमानतळापर्यंत मार्गिका राखीव ठेवणार

143

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडल्यानंतर मतपेटी तातडीने दिल्लीला पाठवण्यासाठी विधानभवन ते मुंबई विमानतळापर्यंत मार्गिका राखीव ठेवली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तशी सूचना गृह विभागाला केली आहे.

( हेही वाचा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आम्हालाच हवे; उद्धवसेना आग्रही )

राष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी विधान भवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मिलिंद भारंबे, शासन मुद्रण व लेखन सामुग्री संचालनालयाचे संचालक रूपेंद्र मोरे, विद्युत कार्यकारी अभियंता सुनीता रावते, वाहतूक पोलीस उपायुक्त महेश पाटील, विधानभवन सुरक्षा व्यवस्थाप्रमुख अर्जुन शिवकुमार, गृह विभागाचे उपसचिव संजय खेडकर, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, मुंबईचे विमानतळ सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक, नागरी विमान वाहतूक महानिदेशालयाचे प्रादेशिक उपायुक्त अशोक सातवसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अवर सचिव सुभाष नलावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता रेश्मा चव्हाण या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती निवडणुकीकरिता १८ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विधान भवनात मतदान होणार आहे. या दिवशी आवश्यक सुरक्षाव्यवस्था गृह विभागाने द्यावी. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटी व इतर साहित्य वाहनाने विधान भवन ते मुंबई विमानतळ (टर्मिनल-२) येथे नेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनासाठी विधान भवन ते मुंबई विमानतळ असा “स्वतंत्र मार्ग” राखीव ठेवावा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. आरोग्य विभागाने या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक यांची नेमणूक करावी. सुरक्षा अधिकारी, तसेच निवडणूक प्रक्रियेचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण करणारे प्रतिनिधी यांना विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश देण्याबाबत संबंधितांना विशेष प्रवेशपत्र देण्यात यावेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी दिल्या.

विमानतळावर तपासणी नको!

विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत म्हणाले, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता अधिकारी व मतपेटी यांची सुरक्षा विषयक तपासणी न होता थेट विमानात प्रवेश मिळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने मतदान कक्ष (आकार २१ x २१ x २१) तयार करावा, मतपेटीस लावावयाचे स्टीकर्स बनविणे, मतदारांकरिता सूचना देणारे फलक तयार करावेत. अग्न‍िशमन विभागाने अग्निप्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ठिकाणची व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

पाहणीसाठी विशेष अधिकारी

राष्ट्रपती निवडणुकीसाठी महाराष्ट्रात होत असलेल्या मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी दीपाली मसीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १७ जुलै रोजी दुपारनंतर त्या मुंबईत पोहोचतील. त्यानंतर निवडणूक तयारीच्या कामकाजाची पाहणी करतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.