- वंदना बर्वे
भारतीय जनता पक्षाने महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या (Congress) महिलांनी हायकामांडवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. पक्ष किमान १५-१६ महिलांना उमेदवारी देईल अशी आशा बाळगलेल्या महिला दिल्लीत दोन दिवसांपासून ठाण मांडून बसल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी (२० ऑक्टोबर) जाहीर केली. यात विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यासोबतच १३ महिलांना तिकीट दिले आहे.
(हेही वाचा – Congress : मविआमध्ये फूट पडणार? सर्व घटक पक्षांमधील मुख्यमंत्रीपदाची लालसा आघाडीत करणार बिघाडी)
काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्रातील नेते मंडळी दिल्लीत दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिढा सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे सुद्धा शेकडो महिला कार्यकर्त्यांसोबत दिल्लीत आल्या आहेत. भाजपाने १३ महिलांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमधील महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निवडणुकीत पक्ष जास्तीत जास्त महिलांना तिकीट देईल अशी आशा त्यांना आहे.
(हेही वाचा – Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ)
संध्या सव्वालाखे ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना म्हणाल्या की, “आम्ही राहुल गांधी यांच्या खऱ्या भावाच्या खऱ्या बहिणी आहोत. आम्ही खोट्या भावाच्या खोट्या बहिणी नाहीत. ते यावेळेस महिलांना जास्तीत जास्त उमेदवारी देतील” असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. महिला काँग्रेस (Congress) कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी “हिंदुस्थान पोस्ट”शी खास बातचीत करताना सांगितले की, “लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत दिलेले सर्व आश्वासन पाळले आहे. आता ते महिलांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पाळतील”, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, महिला काँग्रेसने जवळपास २५ महिलांच्या नावाची शिफारस उमेदवारीसाठी केली असल्याचे समजते. यातील किमान १७-१८ महिलांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community