ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू आहे. भाजपला वाटत असेल की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणिते बदलतील, तर तो भाजपचा गैरसमज आहे, कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
सत्य समोर येणारच!
ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही. त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांचा दुरुपयोग करणे हे भाजपचे काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे, तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश असेल, तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
(हेही वाचा : कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवार नोंदवणार साक्ष!)
खडसेंना अटकेपासून संरक्षण!
पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आले होते. त्याप्रमाणे खडसे गुरुवारी, ८ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांची १३ तास चौकशी करण्यात आली. त्यांना अटकेच्या कारवाईपासून मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे.
Join Our WhatsApp Community