विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबईत येत असून, ‘मातोश्री’च्या दारात ते महापालिका निवडणुकीचा नारळ फोडणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात ते भव्य सभा घेणार आहेत.
शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. १९ जानेवारीला मुंबईत आल्यानंतर ते धारावी आर्थिक केंद्राच्या भूमिपूजनासह विकासकामांचे उद्घाटन करतील. सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्टेशनदरम्यान, नवी मुंबई मेट्रोच्या ५.९६ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
मेट्रो २ अ आणि ७ या ३५ किमी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण ते करतील. त्याशिवाय २८ हजार कोटी रुपयांच्या ७ सीवेज ट्रीटमेंट प्लांटचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाचेही भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. गोरेगाव, ओशिवारा आणि भांडुप येथील तीन रुग्णालयांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही यावेळी होईल.
( हेही वाचा: पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले, राहुल गांधींना सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती! )
बिकेसीमध्ये भव्य सभा
विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर बिकेसीमध्ये ते भव्य सभा घेणार आहेत. यावेळी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित डाओस दौराही रद्द केला आहे. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याने भाजपा पालिका निवडणुकीचा नारळ फोडण्याची तयारी करीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community