पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये समृद्धी महामार्गासह मेट्रो फेज-१ च्या उर्वरित मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बर्डी परिसरातील झिरो माईल स्टेशन ते खापरी स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास करणार आहेत. मेट्रोतील विश्वसनिय सूत्रांनी ही माहिती दिली.
( हेही वाचा : रेशनकार्ड धारकांसाठी सरकारची मोठी घोषणा! १५० किलो धान्य मिळणार मोफत)
नागपुरात आल्यावर पंतप्रधान सर्वात आधी अजनी रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमास जाणार आहे. तिथून ते मेट्रोने प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान खापरी येथून समृद्धी महामार्गावर जाणार आहेत. याठिकाणी टेस्ट ड्राइव्ह करत ते परत एम्स परिसरात होणाऱ्या मुख्य कार्यक्रम सोहळ्यास येतील. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक (रीच 2) आणि झाशी राणी चौक ते प्रजापती नगर (रीच-3) या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉरचे उद्घाटन हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असून ते जमिनीपासून २८ मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे.
दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यात नागपूर तसेच अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा कार्यक्रमही जोडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात नागपूरकरांना एक ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मिळण्याची ही शक्यता आहे. पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावरून महामेट्रो प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वर्धा मार्गावरील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या डबर डेकर पुलाचे डांबरीकरण, येथील दुभाजकांवर लावलेल्या झाडांची कापणी आदी कामे करण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील ट्रॅक, स्टेशनची स्वच्छता आदी करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community