पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना देणार ३८ हजार कोटींचे गिफ्ट

92

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १९ जानेवारीला मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन होणार असून, पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा अधिक लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ चे लोकार्पण, मुंबई महापालिकेच्या २० नवीन ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे ४०० किमी रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आणि पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्ज वितरण आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत.

मेट्रो रेल्वे मार्गिका २अ आणि ७ चे लोकार्पण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे १२ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण होणार आहे. यातील दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका २ अ ही सुमारे १८.६ किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका ७ सुमारे १६.५ किमी लांबीची आहे. सन २०१५ मध्ये या मार्गिकांची पायाभरणी देखील मोदी यांनी केली होती. यावेळी पंतप्रधान मुंबई १ मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) चा प्रारंभ करतील. सुलभ प्रवासासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असून मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल आणि याच्या मदतीने युपीआय द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल.

४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे भूमिपूजन

  • नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ६ हजार ७९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • शिवाय त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही होणार आहे. टर्मिनसच्या दक्षिणेकडील हेरिटेज नोडच्या (वारसा स्थळी) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे, अधिक चांगले मल्टी-मोडल समन्वयन आणि या जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन आणि संवर्धन करणे या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे.
  • या प्रकल्पासाठी १ हजार ८०० कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.