वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी करणार विविध विकासकामांचा प्रारंभ

86

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 23 डिसेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन विविध विकासकामांचा प्रारंभ करणार आहेत. पंतप्रधान आणि वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी वाराणसीच्या विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नरत असतात. वाराणसीत कारखिया येथे उत्तरप्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या फूड पार्कमध्ये पंतप्रधान ‘बनास डेअरी संकुलाची’ पायाभरणी करणार आहेत. 30 एकर जमिनीवर पसरलेला हा दुग्धविकास प्रकल्प अंदाजे 475 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. दररोज 5 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची याची क्षमता असेल. याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताच्या नवीन संधीही निर्माण होतील. बनास डेअरीशी संबंधित 1.7 लाख दुग्ध उत्पादकांना पंतप्रधान डिजिटल माध्यमातून अंदाजे 35 कोटी रुपये वितरित करणार आहेत.

वाराणसीतील रामनगरच्या दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या बायोगॅस आधारित वीजनिर्मिती प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यामुळे हा प्रकल्प ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. NDDB अर्थात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि BIS अर्थात भारतीय मानके संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्ता परीक्षण योजनेसाठी पंतप्रधान या दिवशी संकेतस्थळ सुरु करतील आणि त्यासाठीच्या बोधचिन्हाचे अनावरणही करतील. या बोधचिन्हामध्ये NDDB आणि BIS दोन्हींच्या बोधचिन्हांचा समावेश आहे. दूध क्षेत्राच्या प्रमाणनाची प्रक्रिया यामुळे सोपी होऊ शकणार आहे. तसेच ग्राहकांना दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेविषयी खात्री पटण्यास यामुळे मदत होऊ शकेल.

विविध शहरविकास प्रकल्पांचे उद्घाटन

तळागाळातील स्तरावर जमीन मालकीचे वाद कमी करण्यासाठी पंतप्रधान आभासी माध्यमातून ‘घरौनी’ या ग्रामीण निवासी अधिकार नोंदीचे वितरण करणार आहेत. पंचायत राज्य मंत्रालयाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशच्या 20 लाख रहिवाशांना हे वितरण केले जाणार आहे. याच कार्यक्रमात वाराणसीमधील 870 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 22 प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन केले जाणार आहे. वाराणसीच्या पूर्ण कायापालटासाठी सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांना या प्रकल्पांमुळे बळकटी येणार आहे. वाराणसीतील विविध शहरविकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये जुन्या काशीच्या सहा प्रभागांचा पुनर्विकास, दोन सरोवरांचे सुशोभीकरण, सांडपाणी प्रकल्प, आणि स्मार्ट शहर मोहिमेसाठी 720 ठिकाणी अद्ययावत कॅमेरे आदी सुविधांचा यात समावेश आहे.

शिक्षणक्षेत्रातील काही प्रकल्पांचे उद्घाटन होणार

पंतप्रधानांच्या हस्ते शिक्षणक्षेत्रातील काही प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये केन्द्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आंतर विद्यापीठीय शिक्षक प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. अंदाजे 107 कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारले जात आहे. बनारस हिंदू विद्यापीठात व करौंदी येथील आयआयटीमध्ये बांधलेल्या निवासी सुविधांचाही उदघाटन यावेळी होणार आहे. आरोग्यक्षेत्रात डॉक्टर आणि परिचारिकांसाठीची वसतिगृह व्यवस्था आणि आश्रयाचा प्रकल्प, पन्नास खाटांचे आयुष रुग्णालय, यांचे उद्घाटन होणार आहे. आयुष अंतर्गत होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

(हेही वाचा – नामांकित चिनी मोबईल कंपन्यांवर इन्कमटॅक्सचे धाडसत्र!)

रस्ते सुविधांच्या क्षेत्रात प्रयागराज आणि भादोही रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. यामुळे वाराणसीतील रहदारीचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी श्री गुरु रविदासजी मंदिराच्या पर्यटन विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. याखेरीज आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेतील जलद प्रजनन सुविधेचे, वाराणसीतील दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राचे, पायाकपूर येथे प्रादेशिक संदर्भ प्रमाणन प्रयोगशाळेचे आणि पिंडरा तालुक्यातील ऍडव्होकेट इमारतीचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.