पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, कॅबिनेटचा विस्तार होईल, अशी चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका आणि मिस्र देशांच्या दौऱ्याहून परत आले आहेत. मायदेशी परत येताच पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या काळात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. हा विस्तार २०२१ च्या जुलै महिन्यात झाला होता. मात्र, पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिमंडळाचा विस्तार तीन वेळा करण्यात आला होता.
पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाचा दुसरा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा पंडित दीनदयाल मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात रंगली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणे आहे. याशिवाय, या वर्षाच्या शेवटी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना आणि मिझोरम या पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होणे आहे. या निवडणुका संपल्यानंतर २०२४ मधील लोकसभेची निवडणूक होणे आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता तरूण, तडफदार आणि तेजतर्रार खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. निवडणुकीमुळे भाजप संघटना सुध्दा बळकट करायची आहे. अशात, काही मंत्र्यांना संघटनेत पाठविले जाईल आणि संघटनेतील काही जणांना सरकारमध्ये आणले जाईल अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांचे मंत्रालय अलिकडेच बदलण्यात आले होते.
(हेही वाचा – BRSच्या महाराष्ट्र प्रवेशाने कोणाला होणार राजकीय फायदा?)
काय आहे रणनिती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील किती खासदारांना संधी दिली जाते? याच चर्चा सर्वाधिक आहे. शिंदे गटाला दोन जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्र्याचा समावेश आहे. लोकसभेतील शिवसेनेचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना सोबत ठेवण्याची रणनिती सुध्दा आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, चिराग पासवान यांचा लोजपा आणि शिरोमणी अकाली दल हे तीनच मुख्य मित्रपक्ष सध्या भाजपसोबत आहेत. या सर्वांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात सामावून घेतले जाणार असल्याचेही समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा प्रत्येक विस्तार हा आश्चर्यचकित करणारा राहिला आहे. कधी-कधी अशा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला तर कधी-कधी अशा नेत्यांना संधी देण्यात आली ज्याचा कुणी विचारही केला नव्हता. तत्कालिन मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना मंत्रीमंडळातून काढण्यात आले होते. तर, माजी प्रशासकीय अधिकारी अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्री बनविण्यात आले होते. भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनाही मंत्रीपद गमवावे लागले होते. याशिवाय जेडीयू आणि शिवसेनेच्या कोट्याती मंत्र्यांची जागा अद्याप रिक्त आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community