तुरुंगाची सुरक्षा आणखी बळकट होणार; ड्रोन कॅमेऱ्याने करणार टेहळणी

149
राज्यातील तुरुंगाची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि बॅगेज एक्सरे मशीनच्या खरेदीसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरे आणि एक्सरे सिस्टीम खरेदी करण्यासाठी ३ कोटी ७४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

राज्यात नऊ मध्यवर्ती, २८ जिल्हा कारागृहे

एक महिला, विशेष, किशोरसुधारालय, १९ खुली कारागृहे आणि एक खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत. त्यापैकी येरवडा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, मुंबई मध्यवर्ती, ठाणे आधारवाडी इत्यादी कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आलेले आहेत, त्यात सर्वाधिक कैदी हे न्यायबंदी आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्ये बरोबर तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था महत्वाची आहे.

१२ ड्रोन कॅमेरे आणि ४ बॅगेज स्कॅनर खरेदी केली जाणार

तुरुंगाच्या आतमध्ये आक्षेपार्ह वस्तू आणि पदार्थ पाठवले जात असल्याचा अनेकवेळा आरोप करण्यात आलेला आहे, तुरुंगात बाहेरून येणारे कैदी, न्यायबंदी चोरून लपून छपून वस्तू तुरुंगात घेऊन जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. या सर्वांवर चाप बसविण्यासाठी तसेच तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकरणासाठी  ड्रोन कॅमेरे आणि एक्सरे बॅगेज स्कॅनर सिस्टीमची गरज असल्याचे कारागृह प्रशासनाकडून गृहविभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात आले होते. राज्य शासनाच्या गृहविभागाकडून ड्रोन कॅमेरे आणि एक्सरे स्कॅनर खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. गृहविभागाकडून ड्रोन कॅमेरासाठी १ कोटी ८० लाख तर बॅगेज स्कॅनरसाठी १ कोटी ९४ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ७४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. कारागृह विभागाकडून एकूण १२ ड्रोन कॅमेरे आणि ४ बॅगेज स्कॅनर खरेदी केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.