आज काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे, त्यांना प्रसिद्धीसाठी स्वतः काही करता येत नाही. वीर सावरकर यांना शिव्या दिल्या कि प्रसिद्धी मिळते, म्हणून सवंग प्रसिद्धीसाठी आज दुसऱ्या-तिसऱ्या दर्जाचे नेते वीर सावरकर यांचे नाव घेऊन त्यांची बदनामी करण्याची हिंमत करत आहेत. जनतेने त्यांना त्यांची नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जागा दाखवून दिलेली आहेच आणि आता पुढच्याही निवडणुकांमध्ये त्यांना जागा दाखवून देणार आहे, असा हल्लाबोल स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला.
काँग्रेसचे कर्नाटकातील नेते प्रियांक खरगे यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका करत ‘आपण विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकला असता, अशी दर्पोक्ती केली. ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल, तर त्यांचा फोटो नको. म्हणून सावरकर यांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे मत आहे, असे म्हणत खरगे यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केला. त्यावर रणजित सावरकर यांनी काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला.
स्वतः काँग्रेसच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्या राष्ट्रकार्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत. इंदिरा गांधींनी 1980 मध्ये वीर सावरकरांची स्तुती केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर नॅशनल मेमोरियल सोसायटीचे सचिव पंडित बखले यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी वीर सावरकरांचे फक्त भारताचे प्रतिष्ठीत पुत्र म्हणून वर्णन केले नाही, तर ब्रिटिश सरकारशी त्यांच्या निर्भय संघर्षाचे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात स्वतःचे महत्त्वाचे स्थान आहे, असेही म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी अगोदर काँग्रेसचा इतिहास वाचून मगच बोलायला हवे।– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती.
काँग्रेस १९१९ सालापासूनच सशस्त्र क्रांतिकारकांची बदनामी करतेय
वीर सावरकर यांची बदनामी काँग्रेस नेहमीच करत आली आहे. नुसते वीर सावरकरच नाही, तर सगळ्या सशस्त्र क्रांतिकारकांची बदनामी १९१९ सालापासूनच काँग्रेस करत आली आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कायम क्रांतीकारकांना शिव्याशाप देत आली आहे. क्रांतीकारकांना जर श्रेय दिले तर आपणच स्वातंत्र्य मिळवले या काँग्रेसच्या दाव्याला धक्का पोहचतो, ही त्यांना भीती आहे. इंदिरा गांधी यांचा यात अपवाद आहे, त्यांनी वीर सावरकर यांच्यावर पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले होते. हे वगळता काँग्रेस वीर सावरकर यांचा नेहमीच अपमान करत आली आहे, यात काही नवीन नाही, असेही रणजित सावरकर म्हणाले.
वीर सावरकर राष्ट्रभक्तीची विचारधारा
वीर सावरकर (Veer Savarkar) हे काही फोटोत नाहीत, नोटेत नाहीत किंवा पुतळ्यात नाहीत, सावरकर ही एक विचारधारा आहे, एक राष्ट्रभक्तीची विचारधारा आहे. समर्थ, संपन्न राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी प्रेरणा देणारी ही विचारधारा आहे आणि ही देशभक्त मनात रुजलेली विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसला कर्नाटकातील विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढायचा असेल तर खुशाल काढावा, काही फरक पडत नाही. लोकांच्या मनातील सावरकर कधी जाणार नाही. लोक काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील, असेही रणजित सावरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community