प्रियांक खरगे असुदे किंवा राहुल गांधी असुदे हे वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा कायम द्वेष करत आले आहेत. काँग्रेसच्या याआधीच्या मंडळींनीही वीर सावरकर यांचा द्वेष केला आहे. याचे कारण असे आहे की, वीर सावरकर यांची विचारधारा भारताला हिंदुत्वाच्या आधारे एकसंघ करण्याची होती, हिंदूंमध्ये बंधुभाव वाढवणे हे सावरकर याचे हिंदुत्व होते, समाजात फूट पाडणारे त्यांचे हिंदुत्व नव्हते, त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी मुळातच आपला अभ्यास वाढवला पाहिजे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना म्हणाले.
काँग्रेसचे कर्नाटकातील नेते प्रियांक खरगे यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका करत ‘आपण विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकला असता, अशी दर्पोक्ती केली. ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल, तर त्यांचा फोटो नको. म्हणून सावरकर यांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे मत आहे, असे म्हणत खरगे यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केला. त्यावर सात्यकी सावरकर यांनी काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला.
वीर सावरकर (Veer Savarkar) यांना २५-२५ वर्षांच्या २ जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्याचे सतत प्रयत्न करणे, ज्यात १८५७चे स्वातंत्र्य समर लिहिणे असो किंवा ब्रिटनमध्ये जाऊन तरुणांचे संघटन निर्माण करणे असो, त्यायोगे भारतातील क्रांतिकारकांपर्यंत बॉम्ब मॅन्युअल, पिस्तूल पोहचवणे असो, त्यामाध्यमातून त्यांनी ब्रिटिश वसाहती आणि भारतातून ब्रिटिश साम्राज्य नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्याचे धागेदोरे वीर सावरकर यांच्यापर्यंत पोहचले, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना देशापासून हजार-बाराशे किमी दूर अंदमानात धाडले. यावरून वीर सावरकर नक्कीच मोठे व्यक्तिमत्व होते. ते स्वातंत्र्यवीरच होते, कारण त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देण्याची अजिबातच गरज नाही, असेही सात्यकी सावरकर म्हणाले.
वीर सावरकरांचा पिंड हा लोकशाहीच्या बाजूने
वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी जाती निर्मूलनाचे जे काम केले, तेही एक प्रकारचे स्वातंत्र्ययुद्धच होते. वीर सावरकर यांना हिटलरशाही आणायची होती, असा काँग्रेसचा आरोप आहे. खरे तर वीर सावरकर यांचा पिंड हा लोकशाहीच्या बाजूने होता. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांचा मुस्लिम लीगशी वाद होता पण काँग्रेस मुस्लिमांचे लांगुलचालन करत होती जी अजूनही मतांच्या राजकारणासाठी करत आहे. त्यामुळे वीर सावरकर यांची मते काँग्रेसला पटत नाहीत, म्हणून ते वीर सावरकर यांचा विरोध करत आहेत, असेही सात्यकी सावरकर म्हणाले.