एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधकांकडून चौफेर टीका सुरू असतानाच, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य मंत्र्यांनी आपल्या वाट्याला येणाऱ्या खात्यांचा अभ्यास सुरू केला आहे. मागील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद भूषविलेल्या आमदारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी हा गृहपाठ सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
( हेही वाचा : शिवसेना-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर? )
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार सत्तेत येऊन ३४ दिवस पूर्ण झाले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेच राज्याचा कारभार चालवत आहेत. गेल्या ३० दिवसांत दोघांच्या मंत्रिमंडळाने ७५० हून अधिक जीआर (शासन निर्णय) काढले आहेत. त्याची व्याप्ती जवळपास ५ हजार कोटी इतकी आहे. एकीकडे महाविकास आघाडीने अखेरच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका शिंदे-फडणवीस सरकारने लावला असताना, दुसरीकडे आपल्या आमदारांच्या मतदारसंघांत भरघोस निधी दिला जात असल्यामुळे विरोधकांकडून अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. शिवाय पुरग्रस्तांना मदत, आरे कारशेड अशा मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
ही बाब लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षातील काही वरिष्ठ आमदारांना अभ्यासाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तत्कालीन फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये कामाचा अनुभव असलेल्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. मागील सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेली मंत्रिपदे शिंदे गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाल्यामुळे गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार यांना या खात्यांमध्ये लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. गुलाबराव पाटील सध्या जलसंधारण आणि पाणीपुरवठा, उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण, दादा भुसे कृषी आणि पर्यावरण, शंभुराज देसाई उद्योग, तसेच अब्दुल सत्तार परिवहन खात्याचा अभ्यास करीत आहेत. संबंधित विभागाच्या सचिवांनी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपकडून ‘या’ खात्यांचा अभ्यास सुरू
- महसूल – चंद्रकांत पाटील
- अर्थ आणि नियोजन – सुधीर मुनगंटीवर
- गिरीश महाजन – जलसंपदा
- चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा
- राधाकृष्ण विखे – गृह निर्माण
- प्रवीण दरेकर – सहकार आणि पणन
शिंदे गटाकडून ‘या’ खात्यांचा अभ्यास सुरू
- जलसंधारण आणि पाणीपुरवठा – गुलाबराव पाटील
- उच्च आणि तंत्र शिक्षण – उदय सामंत
- कृषी आणि पर्यावरण – दादा भुसे
- उद्योग- शंभुराज देसाई
- परिवहन – अब्दुल सत्तार
शिंदे-फडणवीसांचे काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात रस आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह आणि सामान्य प्रशासन विभाग आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community