शेतकऱ्यांचे सरकार आहे, हे कृतीतून सिद्ध करा- अजित पवारांचा हल्लाबोल

128

राज्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरू आहे. राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही. याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी हे कृतीतून दाखवा.हे शेतकर्यांचे सरकार आहे,हे कृतितून सिद्ध करा, असा हल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर चढविला.

( हेही वाचा : राज्यावरील कर्ज १४.२३ टक्क्यांनी वाढले; कॅगच्या अहवालातून उघड )

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.

राज्यात मागच्या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत आहे. राज्यातली सर्व धरणे भरलेली आहेत. हवामान खात्याने यापुढेही पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मोठा पाऊस झाला तर धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पाटबंधारे खात्याचा अधिकारी रात्रीच्या वेळी धरणावर असला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. धरणातून पाणी सोडण्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचा फटका खालच्या बाजूच्या लोकांना भोगावा लागू शकतो असेही अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रातल्या अनेक भागात नदीमध्ये अतिक्रमण होत आहे. नदीत राडारोडा टाकला जातोय. त्यामुळे नदीचे पात्र उथळ होत आहे. नदीमधील अतिक्रमण रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच पूरामुळे खचलेल्या विहिरी दुरुस्त करुन देण्यासाठी मनरेगा म्हणून मदत दिली पाहिजे. अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांबाबत एनडीआरएफचे निकष जाचक आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल जनावर कसे काय शोधणार? याबाबतीत निकष बदलून मदत करावी. पिक कर्ज माफ केले पाहिजे. ज्या घरांचे नुकसान झाले त्यांनाही मदत दिली पाहीजे. घर पुर्ण पडले किंवा अशंतः पडले तरच मदत दिली जाते. पण काही घरांना ओलावा येऊन भेगा पडतात. अशा घरांनाही मदत देण्यासाठी पंचनामे केले पाहिजेत. या अतिवृष्टीच्या काळात गोगलगायीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात पाहायला मिळाला. आपल्या मदतीच्या निकषांमध्ये गोगलगायीने पिकांचे नुकसान केल्यास मदतीची तरतूद नाही. त्यामुळे याबाबीचा वेगळा निर्णय सरकारला घ्यावा लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

यावर्षी १ ऑक्टोबरलाच साखर कारखाने सुरू करा

मागच्यावर्षी पेक्षा यंदा चांगला पाऊस झाला आहे. धरणे, नदी, नाले, तलाव भरले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी पेक्षाही ऊस राज्यात लावला गेला आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न यंदा अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी आणि १ नोव्हेंबर ऐवजी १ ऑक्टोबर रोजी साखर कारखाने सुरु करावेत. मागच्या वर्षीचा सर्व ऊस संपला नाही. त्या अनुभवावरुन यावर्षी लवकर कारखाने सुरु करावेत, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

मुख्यमंत्री हे वागणे बरं नव्हे

अजित पवार यांनी आपल्या भाषणात टोलेबाजी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कानपिचक्या दिल्या. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांना पुरवणी मागण्यात प्रत्येकी ५० कोटी दिले आहेत. भाजपनेही आपल्या आमदारांना निधी दिला आहे. पण आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे असे सांगत मुख्यमंत्री साहेब हे वागणं बरं नव्हं असे सुनावले. कधी कोणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. आपल्याला पुन्हा एकत्र यावे लागू शकते. त्यामुळे असा अन्याय करू नका, असा टोलाही पवार यांनी लगावला.

अजित पवार यांचे भाषण सुरू असताना शिंदे गटाचे आमदार आपली पत्रे घेऊन एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी करीत होते. त्यावर टोलेबाजी करताना अजित पवार म्हणाले, तुम्हाला आता या ४० आमदारांना सांभाळायचे आहे. पण एक दिवस तरी विरोधकांचे ऐका. या ४० आमदारांची कामे करण्यासाठी तर स्वतंत्र कार्यालयच उघडले आहे. बाकी दहा अपक्ष असेच आहेत, असे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.