मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी राज ठाकरेंच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांमधून अजान वाजवली जात आहे. त्यामुळे त्याविरोधात राज ठाकरे यांनी कणखर भूमिका घेत मशिदींच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात यावी, असे आवाहन केले होते. त्यातून राज ठाकरे यांनी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केला, असा मुद्दा याचिकाकर्त्याने जनहित याचिकेत मांडला आहे.
राज ठाकरे दोन धर्मात तेढ निर्माण करतात
राज ठाकरे यांनी दोन समाजांत दुही निर्माण करणे, चिथावणी देणारी भाषणे करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेचे १२४-अ (राजद्रोह) हे कठोर कलम लावण्याचा आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर.एन. कचवे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केले, त्यामुळे तेथील पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), ११६ (गुन्हा घडण्यासाठी उद्युक्त करणे) व ११७ (दहापेक्षा अधिक व्यक्ती किंवा लोकांकडून गुन्हा घडण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे) या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. मात्र पोलिसांनी कलम १२४-अ लावलेले नाही. राज ठाकरे हे समाजात दुही निर्माण करत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले होते. राज यांच्या आवाहनाप्रमाणे अनेक ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे कार्यक्रमही होऊ लागले. परिणामी समाजातील शांतता बिघडली आहे. तरीही पोलिसांनी योग्य ती दखल घेतलेली नाही. त्यामुळे पोलिसांना राज यांच्याविरोधात राजद्रोहाच्या कलमासह गुन्हा नोंदवण्याचा आदेश द्यावा. तसेच भोंगे व हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर आणखी पत्रकार परिषदा घेण्यास राज यांना मनाई करावी, अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
(हेही वाचा न्यायालयानंतर आता महापालिकेची राणा दाम्पत्याला नोटीस )