मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट… एकाला अटक!

अनेक राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत व्यक्तींबाबत सध्या समाज माध्यमांमध्ये अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत असतात. आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल एका व्यक्तीने आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केली आहे. ही व्यक्ती पुणे येथील भाजप कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत असून, पुणे विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

७ मे रोजी गुन्हा दाखल

राजेंद्र पंढरीनाथ काकडे असे या व्यक्तीचे नाव असून, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे. 7 मे रोजी लोहगाव येथील आनंद गोयल यांनी या आक्षेपार्ह पोस्टविरोधात तक्रार नोंदवली होती. प्रतिष्ठीत व्यक्तीची बदनामी करण्याच्या आरोपावरुन पोलिसांनी काकडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

मोदी आणि योगी यांच्याबाबतही आक्षेपार्ह पोस्ट

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सुद्धा अशाच आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सचिव मोहसीन शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शरद पवारांनाही धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना एका बनावट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात तब्बल 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या तक्रारीवरुन मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here