राज ठाकरेंना त्यांच्याच व्यंगचित्रातून देण्यात आले सडेतोड उत्तर

167

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरुन केलेल्या वक्तव्यानंतर, शिवसेना आणि मनसेत संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये पोस्टर वाॅरही सुरु झाले आहे. कधी मनसे तर कधी शिवसेना एकमेकांविरोधात पोस्टरबाजी करत आहेत. आता असेच एक पोस्टर पुण्यात झळकले आहे. या पोस्टरमधून पुणेरी शैलीत राज ठाकरेंना त्यांच्याच व्यंगचित्रावरुन डिवचण्यात आले आहे.

इथे लावण्यात आले बॅनर

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. आता त्यांच्या याच घोषणेनंतर राज्यभरात बॅनरबाजी सुरु झाली आहे. पुण्यात चक्क राज ठाकरेंनी काढलेल्या एका व्यंगचित्राचे बॅनर झळकले आहे. शहरातील अल्का टाॅकीज चौक, गुडलक चौक, कोथरुड येथील करिष्मा चौक येथे लावण्यात आले आहेत.

काय लिहिलेय बॅनरवर?

अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला आणि श्री राम मंदिराला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व असा मजकूर बॅनरवर लिहण्यात आला आहे.

( हेही वाचा: …तरीही बालविवाह होतात कसे? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल )

राज ठाकरेंच्या दोन घोषणा

राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत 5 जुनला अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. तसेच, 1 मे महाराष्ट्र दिनी संभाजी नगरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेवरुन टीका केली जात आहे. सध्या पुण्यातील या बॅनरवर चर्चा सुरु आहे. तसेच, हे बॅनर कोणी लावले हे अद्याप समजू शकलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.