पुणेकरांचा कौल कुणाला? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

86

कसबापेठ आणि चिंचवड या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झालेली आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होणार आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापांविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

( हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर!)

कसबापेठ येथील 270 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1,250 मतदान अधिकारी आणि 683 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक रिटर्निंग ऑफिसर स्नेहा के. देवकते म्हणाल्या की, कसबापेठची मतदार संख्या 2 लाख 75 हजार 679 आहे, याशिवाय 54 नागरिक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणार आहेत.

तसेच चिंचवडमधील 510 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यामध्ये 3 हजार मतदान अधिकारी, 3 हजार 707 पोलीस कर्मचारी आणि 725 अधिकारी तैनात असणार आहेत. चिंचवडमध्ये 5 लाख 68 हजार 954 मतदार असून यातील 248 नागरिक टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करणार असल्याचे निवडणूक अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

चिंचवडमध्ये मतदान केंद्र क्रमांक 195 हे ‘सखी मतदान केंद्र’ म्हणून नियुक्त करण्यात आले असून, महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येथे नियुक्त करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक 23, 395 आणि 405 हे ‘मॉडेल मतदान केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून चिंचवडमधील मतदारांसाठी योग्य व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.