रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही मोदींवर टीका केली. पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत. शरद पवारांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शरद पवारांना चपराक दिली आहे.
काय म्हणाले पुण्याचे महापौर
मेट्रो प्रवाशी संख्येचा नवा उच्चांक! लोकार्पणानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी मेट्रो प्रवाशी संख्येने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आज तिसऱ्या दिवशी तब्बल ४२ हजार ०७० जणांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं, असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते?, अशा शब्दात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत टीका करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – महापालिका निवडणूक भाजप मिशन: महापालिका १३४, भाजप १३४ प्लस)
मेट्रो प्रवाशी संख्येचा नवा उच्चांक!
लोकार्पणानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी मेट्रो प्रवाशी संख्येने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आज तिसऱ्या दिवशी तब्बल ४२ हजार ०७० जणांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं, असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते?
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 8, 2022
काय म्हणाले होते पवार?
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी पवार म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत, यावर माझा आक्षेप नाही. कामं होत असतील आणि त्यांचं उद्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार असण्याचे कारण नाही. ते मेट्रो का सुरू करत आहेत. ते मला माहिती नाही. महिनाभरापूर्वीच मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेले होते . पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्याच मार्गाने मी देखील गेलो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही. मग काम झालं नाही तरी उद्घाटन की करताय, असे शरद पवार म्हणाले होते.
भाजपची पवारांवर खोचक टीका
आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? असा सवाल भाजपने केला आहे. तुमची अडचण इथे आहे की, ‘मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमले नाही’ असे म्हणत भाजपने पवारांवर खोचक टीका केली.