पुण्यातील वाघोली ई-डेपो पूर्ण क्षमतेने सज्ज! PMPML च्या प्रवाशांना होणार फायदा

153

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) पुणे शहरातील सर्वांत मोठा वाघोलीचा ई-डेपो दोन दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या ठिकाणी चार्जिंग स्टेशनला वीज जोडणी पूर्ण झाली असून, या ठिकाणाहून १०५ ई-बस विविध भागांत सुरू होणार असून PMPML च्या ५० हजार प्रवाशांना फायदा होणार आहे.

पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि काही ग्रामीण भागात १६५० बसमार्फत सेवा दिली जाते. यामध्ये इलेक्ट्रिक बसची संख्या ३९८ आहे; तर ६० बस सध्या उभ्या आहेत. दोनशे ई-बस अद्याप येणे बाकी आहे. शहरात पीएमपीचे भेकराईनगर, पुणे स्टेशन, बाणेर, वाघोली, निगडी हे पाच ई-डेपो सुरू आहेत. यापैकी वाघोली ई-डेपोला वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने झालेला नव्हता. त्यामुळे या डेपोमधील ३२ चार्जिंग पॉइंट सुरू होते; तर २२ चार्जिंग पॉइंट सुरू होणे बाकी होते.

(हेही वाचा – पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार, फडणवीसांची घोषणा)

सध्या वाघोली डेपोमधून ५० ई-बस धावतात. यामधून दिवसाला साधारण ४० हजार प्रवासी प्रवास करतात. आता ‘महावितरण’कडून येथे पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे आता आणखी ५५ गाड्या वाढणार आहेत. त्यामुळे येथून एकूण १०५ गाड्या सुरू असल्यामुळे त्याचा ५० हजार प्रवाशांना फायदा होणार आहे.

वाघोली ई-डेपो येथून सध्या कात्रज, हडपसर, मनपा, निगडी, लोहगाव, वारजे-माळवाडी अशा शहराच्या वेगवेगळ्या भागांत इलेक्ट्रिक बस सुरू आहेत. हा ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आणखी बस वाढून इतरही मार्गावर बस सुरू होणार आहेत. त्यामुळे वातानुकूलित ई-बसमधून नागरिकांना शहरभर प्रवास करता येणार आहे.

वाघोली ई-डेपोची माहिती

  • चार्जिंग पॉइंट – ५२
  • सुरू असलेले चार्जिंग पॉइंट- ३२
  • सुरू होणारे पॉइंट- २०
  • ई-डेपोतून सध्या धावणाऱ्या बस – ५०
  • नव्याने वाढविण्यात येणाऱ्या बस – ५५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.