पाण्यासाठी राष्ट्रवादी गेली भाजप खासदाराच्या दारी

166

पुणे शहरातील पाण्याच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. गेली ५ वर्षे पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे पाणी प्रश्नांची जबाबदारी घेऊन पुण्याचे खासदार भाजप नेते गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी करण्यात आली. आंदोलनाच्या वेळी “अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट”, “पाणी देणार होते 24 तास, मात्र पाणी मिळेना आम्हाला धड दोन तास”, “24×7 योजनेचे काय झाले..?” , “गिरीश बापट जवाब दो”, “खासदार साहेब झाली का झोप.?” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

केवळ भाजप जबाबदार

New Project 73

प्रशांत जगताप म्हणाले, “पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे, पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे हे भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. 2017 च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की 24 तास तर सोडा हक्काचे 1 तास सुध्दा पाणी मिळत नाही.

( हेही वाचा: ‘ही’ चूक तुम्ही करू नका… कारण थेट दाखल होईल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा! )

अचानक पुणेकरांच्या प्रश्नाची जाण

मुळात समान पाणी वाटप योजनेचे काम तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु पाच वर्षे होऊन देखील भाजपला हे काम पूर्ण करता आले नाही. या कामाची झळ आज समस्त पुणेकरांना बसत आहे. हा सर्व गलथान कारभार सुरू असताना, पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आता प्रशासक आल्यानंतर मात्र झोपेतून जागे झालेल्या कुंभकर्णाप्रमाणे ते जागे झाले असून, त्यांना अचानकपणे पुणेकरांच्या प्रश्नांची जाणीव होऊ लागली आहे, असेही प्रशांत जगताप म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.