मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या सर्वसामांन्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चाहता वर्ग तयार झाला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखाच दिसणा-या तरुणावर आता पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. विजय नंदकुमार माने असे या तरुणाचे नाव असून पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगारासोबतचा फोटो व्हायरल
चेह-यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखीच वाढवलेली दाढी,कपाळावर लाल टिळा आणि मुख्यमंत्र्यांप्रमाणेच पांढरा शर्ट आणि पँट घालत फिरणा-या माने या फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पेहेरावात त्याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत देखील फोटो सेशन केले आणि ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. हा प्रकार विजय माने यांच्या अंगलट आला असून त्याच्याविरोधात बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विजय माने याला पोलिसांनी अजून अटक केली नसल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश,पक्षाचेही विलीनीकरण)
पोलिसांनी केला तपास
व्हायरल होणा-या या फोटोमध्ये गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असून त्याच्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे उभे आहेत की काय असाच भास होतो. त्यामुळे नीट तपास केल्यानंतर करत फोटोमधील तरुण हा विजय माने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल
विजय माने हा तरुण मुख्यमंत्र्यांप्रमाणेच हुबेहुब पेहराव करत विविध सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत असे. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करुन विजय माने आणि इतरांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे याबाबत अधिक तपास करत आहेत.
(हेही वाचाः ‘पुरुषोत्तम करंडका’साठी कोणीच नाही सर्वोत्तम, 57 वर्षांत पहिल्यांदाच लागला ऐतिहासिक निकाल)
Join Our WhatsApp Community