पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी खाली केली देशाची ‘मान’? जास्त दारू प्यायल्यामुळे विमानातून उतरवल्याचा आरोप

101

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जास्त मद्यपान केल्यामुळे भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून उतरवण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. आम आदमी पक्षाने मात्र या बातम्या निराधार असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.

भगवंत मान हे नुकतेच जर्मनी येथे गेले होते. त्यावेळी मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचे ट्वीट करत बादल यांनी माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्टस्चा दाखला देत बादल यांनी हा दावा केला आहे.

लाजिरवाणी बाब

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे जर्मनीला गेले असताना त्यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आले. सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मीडियामध्ये या बातम्या येत आहेत. मान यांच्यामुळे विमान उड्डाणाला देखील तास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब जगभरातील पंजाबींना लाजवेल अशी आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पंजाब सरकार मात्र याबाबत गप्प आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे,असे बादल यांनी म्हटले आहे.

पंजाबी आणि राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने भारत सरकारने देखील याबाबत पावले उचलायला हवीत. जर मान यांना विमानातून खाली उतरवले असेल तर भारत सरकारने जर्मन अधिका-यांसोबत याबाबत चर्चा करायला हवी, अशी मागणीही सुखबीर सिंग बादल यांनी केली आहे.

चौकशीची मागणी

पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी देखील याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री मान हे प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे एअरलाइन्स प्रशासनाने त्यांमा फ्रँकफर्टमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी चौकशीचे आदेश द्यावेत असे बाजवा यांनी म्हटले आहे.

आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री मान हे या दौ-यादरम्यान ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीत परतले. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.