केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून, गुरुवारी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. मात्र, त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दुग्धाभिषेकाने शुद्धीकरण केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण केले. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत.
म्हणून शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
आज ही वास्तू अपवित्र झाली, तिथे दुग्धाभिषेक करुन शुद्धीकरण केले. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुऊन तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसली, इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केले आहे.
(हेही वाचाः राणे आले, पण बाळासाहेबांना चाफ्याची फुले आणायला विसरले!)
काय म्हणाले आप्पा पाटील?
मी रोज इथे येतो असे आप्पा पाटील यांनी म्हटले आहे. सकाळी मी आलो होतो, पण पोलिसांनी मला आतमध्ये येऊ दिले नाही. पण माझे रक्त मला शांत बसू देत नव्हते. कुठेतरी ही वास्तू पवित्र होणे गरजेचं आहे असे मला वाटले. मग बाळासाहेबांच्या वास्तूला दुग्धाभिषेक करुन ती पवित्र करण्याचा माझा प्रयत्न केला, असे आप्पा पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community