सध्या राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे हे अडचणीत आले आहेत, कारण त्यांची पत्नी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी होत्या आणि त्या महासंघाची चौकशी करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना जिल्हा दूध संघाचे मुख्य प्रशासक, आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्यावर जहरी टीका केली. खडसे परिवाराकडून दूध संघाचा स्वत:ची प्रॉपर्टी म्हणून वापर झाला, दूध संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, तो भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत. मंदाकिनी खडसे यांनी नियमानुसार व आपली नैतिकता दाखवून वर्षभरापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. मात्र त्यांनी ती नैतिकता दाखवली नाही, त्यांनी याआधी अनेकवेळा पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजीनामा दिलाच नाही. खडसे यांना जर खोटे बोलणे मोजणाऱ्या मशीनसमोर उभे केले तर मशीन बंद पडेल, असे आमदार चव्हाण म्हणाले.
भ्रष्टाचाराचा पिक्चर आम्ही टप्प्याटप्प्याने दाखवणार
दूध संघ पूर्णपणे राजकीय अड्डा बनवण्यात आला आहे. आता त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पिक्चर आम्ही टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे. या सिमेनानंतर खडसे परिवाराला पळता भुई थोडी होणार असल्याचा गौप्यस्फोट जिल्हा दूध संघाचे मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. दूध संघात मंगळवारी संचालक मंडळाने बैठक घेतल्यानंतर मुख्य प्रशासक म्हणून मंगेश चव्हाण यांनी ही बैठक संपल्यानंतर प्रशासक मंडळाच्या सदस्यांसोबत चर्चा केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी दूध संघाचे प्रशासक मंडळातील सदस्य अरविंद देशमुख, अजय बढे हे देखील उपस्थित होते. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. आम्ही नियमानुसार कार्यकारी संचालकांकडून पदभार घेतला असून, सहकारी संस्थाचे नाशिक विभागीय उपनिबंधक सुरेंद्र तांबे यांच्या आदेशानुसारच पदभार घेतला असल्याने बेकायदेशीर म्हणण्याचा संबंध येत नाही, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community