राज्यात राष्ट्रपती राजवट लावा! नारायण राणेंची केंद्राकडे मागणी 

दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली.    

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. शहा यांना दिल्लीत असतानाच तीन दिवसांपूर्वी पत्र लिहून ही मागणी केल्याचे राणे यांनी सांगितले.

अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तीक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, राज्यात अस्थिर वातावरण आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचे राणे म्हणाले.

(हेही वाचा : राज्यात कोरोनाचा उद्रेक; १६,६२० नवीन रुग्ण!)

आता सगळ्याच प्रकरणांची चौकशी करा!

दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता, असा दावा करतानाच दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

वाझेंचा गॉडफादर कोण?

वाझेंची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली? दिशा सालियन प्रकरणातही वाझेंकडे पोस्टिंग कोणी दिली? पोलीस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे? वाझेंना कोण वाचवत आहे, याची माहिती उघड झाली पाहिजे, असेदेखील राणे म्हणाले. सचिन वाझेंना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच बेकायदेशीर कामे सुरू आहेत. वाझेंच्या जीवावरच शिवसेनेकडून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. वाझे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here