ते आले… त्यांनी पाहिलं आणि भुर्रकन उडून गेले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याने नेमकं साधलं तरी काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

65

तौक्ते चक्रीवादळाने कोकणात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सध्या राजकीय नेत्यांचे कोकणातले पाहणी दौरे सुरू आहेत. दोन्ही विरोधी पक्षनेते सध्या कोकणच्या पाहणी दौऱ्यावर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शुक्रवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या चार तासांच्या दौऱ्यात नेमका त्यांनी कोकणाचा दौरा केला तरी कसा, असा प्रश्न मात्र यावेळी उपस्थित झाला आहे. तौक्ते वादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री आले, त्यांनी पाहिलं आणि ते भुर्रकन पुन्हा त्यांच्या हेलिकॉप्टरमधून उडून गेले, असेच या दौऱ्याचे विश्लेषण करावे लागेल. विरोधकांनी देखील आता मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.

अवघ्या चार तासांत नेमकं काय पाहिलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकणचा पाहणी दौरा करणार अशी चर्चा आधी होती. मात्र गुरुवारी मुख्यमंत्री कार्यालायतून आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फक्त एक दिवस कोकणच्या दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पाहिला तर ते फक्त चार तासांतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार होते. त्यानुसार मुख्यमंत्री सकाळी ८.३५ ला रत्नागिरी येथे पोहोचले व त्यानंतर सिंधुदुर्ग येथे जाऊन, दोन्ही जिल्ह्यांची पाहणी करुन ते अवघ्या चार तासातं मुंबईत परतले.

(हेही वाचाः ठाकरे सरकारला नको आहे केंद्राची मदत?)

या भागांचा पहाणी दौरा कोण करणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात एकूण सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग असे ८ तालुके आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त मालवण आणि वेंगुर्ला येथेच धावता पाहणी दौरा केला. सगळ्यात जास्त नुकसान हे किनारपट्टी भागात झाले आहे. सर्वच तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दौरा का केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याने नेमकं साधलं तरी काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करुन जाणार अशी टीका विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर केली होती. यानंतर मी विरोधकांना उत्तर द्यायला आलेलो नाही. मी कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन गेलो नाही. जमिनीवर उतरलो आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच दौरा जरी चार तासांचा असला, तरी मी फोटोसेशनसाठी आलेलो नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानाचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.

(हेही वाचाः पंचनामे पूर्ण होताच कोकणाला मदत! मुख्यमंत्र्यांची घोषणा )

 

देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका आणि तरीही स्वतः मात्र टीका करत आहेत. मला राजकीय बोलायचं नाही, पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मोदी गुजरातला गेले, ते गोवा आणि महाराष्ट्रात का आले नाहीत? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यांत का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारने काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा दर्शनाचा कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांच्या या दौ-याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही ट्वीट करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी कोकणात किती वेळ दौरा केला, याचा हिशोब करुन दाखवला आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांनी कोकणवासीयांच्या दारोदारी जाऊन त्यांची विचारपूस केली, तर मुख्यमंत्र्यांचा दौरा हा केवळ दर्शनाचा कार्यक्रम होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

(हेही वाचाः कोकणवासीयांना भरघोस नुकसान भरपाई द्या! फडणवीसांची सरकारकडे मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.