काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांवर (Veer Savarkar) खोटे आरोप करत त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्याच्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाने जामीन दिला. न्यायालयाने त्यांना 10 जानेवारी ला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र राहुल गांधी हे व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे हजर झाले. न्यायालयाने राहुल गांधी यांना त्यांची आरोपी म्हणूनच नाव आणि ओळख विचारून घेतली, तसेच न्यायालयात या विषयावरील सुनावणीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत राहुल गांधी यांना अर्धा तास व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे बसवून ठेवले. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी, अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ डिसेंबर २०२४ ला पुण्यातील विशेष न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता. पुण्यातील खासदार/आमदार यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयाने हा महत्त्वाचा आदेश दिला होता. मात्र राहुल गांधी या दिवशी न्यायालयात हजर राहिलेच नाहीत. त्यावेळी त्यांनी आपल्याला संसदेच्या अधिवेशनात हजर राहावे लागत असल्याचे कारण न्यायालयाला दिले होते. या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला पार पडली. जर राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले नाही तर त्यांच्यावर अटक वॉरेंट निघाला असता. म्हणून राहुल गांधी हे व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे न्यायालयात हजर झाले.
२५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन
शुक्रवार, १० जानेवारीला न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जोपर्यंत हा खटला सुरू आहे तोपर्यंत वीर सावरकरांबद्दल कोणतेही विधान करू नये, असे निर्देश न्यायालयाने राहुल गांधींना दिले आहेत.
दरम्यान याचिकाकर्ते सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांचे वकील अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी राहुल गांधी यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे हजर राहणे चुकीचे होते, असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांनी केलेल्या तक्रारीनुसार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये सांगितले होते की, विनायक दामोदर सावरकरांनी एक पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, ते (सावरकर) आणि त्यांचे पाच किंवा सहा मित्र एका मुस्लिमाला मारहाण होत असल्याचे पाहत असताना आनंदीत झालो. त्यानंतर राहुल गांधींनी म्हटले की, हे भ्याड कृत्य नाही का… पण सावरकरांनी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) दावा केल्याप्रमाणे असे कोणतेही पुस्तक लिहिलेले नाही किंवा अशी घटनाही घडलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी पुराव्यासहित न्यायालयात मांडले आहे.
सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर हेतुपुरस्सर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. हे आरोप असत्य आहेत हे पूर्णपणे जाणूनही त्यांनी सावरकर (Veer Savarkar) आडनावाची बदनामी करण्याच्या विशिष्ट हेतूने प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने आरोप केले. या याचिकेत त्यांनी पुरावा म्हणून काही बातम्यांचे अहवाल तसेच राहुल गांधींच्या लंडनमधील भाषणाच्या व्हिडिओची YouTube लिंक सादर केली होती. सात्यकी यांनी आरोपींना आयपीसी कलम ५०० अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली आहे.