काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची बदनामी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. आता या खटल्यातून सुटका करून घेण्याचा राहुल गांधी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता. त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून आपल्यावरील जे जे आरोप करण्यात आले आहेत, ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली होती, मात्र याला सात्यकी सावरकर यांनी विरोध केल्यानंतर बुधवारी, १९ मार्चला झालेल्या सुनावणीच्या वेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हा अर्ज मागे घेतला. त्यानंतर सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी हा खटला जलद गतीने चालवण्यात यावा, अशी मागणी केली.
पुणे न्यायालयात अधिवक्ता मिलिंद पवार यांच्या माध्यमातून आरोपी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सीआरपीसी २५८ नुसार या खटल्यातून त्यांना मुक्त करावे, तसेच खटला स्थगित करून आपणास दोषमुक्त करावे, यासाठी अर्ज केला होता, तसेच हे प्रकरण समन्स ट्रायल पध्दतीने चालवावे म्हणजे आरोपी आणि तक्रारदार यांना पुरावे सादर करता येतील, असा अर्ज केला होता. त्याला तक्रारदार सात्यकी सावरकर यांचे वकील कोल्हटकर यांनी विरोध केल्यामुळे आरोपी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बुधवारी वकिलांनी सीआरपीसी २५८ चा अर्ज न्यायालयाने नाकारून राहुल गांधी यांची नाचक्की होण्यापूर्वीच त्यांनी हा अर्ज मागे घेतला. त्यावेळी या गुन्ह्यात २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे समन्स खटला चालवला जावा, समरी खटला चालवू नये, असे शेवटी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वकिलाने न्यायालयास सांगितले. त्याला सात्यकी सावरकर यांचे वकील कोल्हटकर यांनीही समर्थन देत हा खटला समन्स पध्दतीनेचा चालवला जावा, जेणेकरून फिर्यादी आणि आरोपी या दोघांना त्यांचे त्यांचे पुरावे सादर करण्याची संधी मिळेल, असे म्हटले. यावेळी न्यायालयाने या मागणीवर ७ एप्रिलला निर्णय देईल, असे म्हटले. यावेळी वकील कोल्हटकर यांनी हा खटला आमदार-खासदार न्यायालयाच्या नियमानुसार शीघ्र गतीने चालवावा, अनावश्यक दिरंगाई होऊ देऊ नये, अशी विनंती केली.
Join Our WhatsApp Community