अदाणी (Adani) समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लागलीच राहुल गांधी यांनी भाजपावर हल्लाबोल केला. अमेरिकन एजन्सीने अदाणी यांना रंगेहाथ पकडले आहे, मात्र भारतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांना अटक करावी. पंतप्रधान मोदी यांनी अदाणींसोबत हातमिळवणी केली आहे, असा आरोप केला. त्यावर भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला केला. अदाणींच्या कंपनीविरोधात अमेरिकेत खटला सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आतापर्यंत कंपनी आणि त्याविरुद्धच्या खटल्याबद्दल, कंपनीने त्यांची बाजू मांडली आहे. भारतासाठी काम करणाऱ्या संस्थांवर हल्ला करणे ही राहुल गांधींची रणनीती आहे, त्यांनी राफेलचा मुद्दाही तसाच उचलला होता. राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांची विश्वासार्हता इतकी जास्त आहे की अलीकडेच त्यांना परदेशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशा शब्दांत पात्रा यांनी राहुल गांधी यांना सुनावले.
काय म्हणाले संबित पात्रा?
भाजपाचे खासदार संबित पात्रा म्हणाले की, अदानी (Adani) समूहावरील अमेरिकेच्या आरोपांमध्ये नमूद केलेल्या चार राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री नव्हता; छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असताना भाजपा खासदार संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. संबित पात्रा यांनी विचारले की, आंध्र प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे आणि त्यांनी तेथे अदानी (Adani) समूहासोबत जास्तीत जास्त व्यवहार केले आहेत. छत्तीसगडचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवरही प्रश्न उपस्थित केले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदाणी (Adani) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या गौतमबाबत राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकन एजन्सीने त्याला रंगेहाथ पकडले आहे, मात्र भारतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांना अटक करावी. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अदाणीसोबत हातमिळवणीचा आरोप केला. आम्ही गप्प बसणार नाही. हा मुद्दा संसदेतही मांडणार आहे. भाजपा सरकार अदाणींना वाचवेल हेही आम्हाला माहीत आहे. अदाणी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नसल्याचे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले आहे. अदाणी आता तुरुंगाबाहेर का? अदाणी यांना अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) चौकशी करावी.
माधवी बुच यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले
अदाणी यांच्यासोबतच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत माधवी बुच यांचेही नाव घेतले. त्यांनी माधवी बुच यांच्यावर अनेक आरोप केले. माधवी बुच यांना पदावरून हटवावे, असे राहुल गांधी म्हणाले. ती अदाणी यांना वाचवत आहे. त्यांनी त्याच्या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही. माधवी बुच यांचीही चौकशी झाली पाहिजे, तिचे हितसंबंध अदानी कंपनीशी जोडलेले आहेत.
अदाणी यांच्यावर काय आहेत आरोप?
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला. गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. ज्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण दिसली. तर अदाणी एनर्जी सोल्यूशनही लाल रंगात रंगले. अदाणी ग्रीन एनर्जी कंपनीला कंत्राट मिळविण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप ठेवला गेला. या कंपनीच्या शेअरमध्ये १९.१७ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. अदाणी टोटल गॅस १८.१४ टक्के, अदाणी पॉवर १७.७९ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
Join Our WhatsApp Community