स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी, अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ डिसेंबर २०२४ ला पुण्यातील विशेष न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता. पुण्यातील खासदार/आमदार यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयाने हा महत्त्वाचा आदेश दिला होता. मात्र राहुल गांधी या दिवशी न्यायालयात हजर राहिलेच नाहीत. त्यावेळी त्यांनी आपल्याला संसदेच्या अधिवेशनात हजर राहावे लागत असल्याचे कारण न्यायालयाला दिले होते, मात्र हेच राहुल गांधी अधिवेशनाच्या कालखंडात २० डिसेंबरला संभल येथे जाऊन आले, सोमवार, २३ डिसेंबरला महाराष्ट्रातील परभणीत आले. राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात येतात, पण महाराष्ट्रातील न्यायालयात सुरु असलेल्या सावरकर बदनामी खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्याचे का टाळतात, असा सवाल सावरकर बदनामी खटल्यातील वकील अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना उपस्थित केला आहे.
राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
परभणी जिल्ह्यात १० डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. या विषयाचे विरोधक मोठ्या प्रमाणावर राजकारण करत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आकांड तांडव केला होता. हिवाळी अधिवेशन संपताच राहुल गांधी सोमवार, २३ डिसेंबरला सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी परभणीत आले. त्यामुळे आता यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सावरकर बदनामी खटल्यावरून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे.
राहुल गांधींकडून न्यायालयाचा अवमान, नायालयात अर्ज दाखल
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना वीर सावरकर यांचा अवमान करणारी बिनबुडाची वक्तव्य केली होती. त्यावरून वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यात खटला दाखल केला. त्यावर अनेक सुनावण्या झाल्या, अखेर हे प्रकरण पुण्यातील खासदार/आमदार यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयात वर्ग झाले. या न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. परंतु या दिवशी राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयात हजर झालेच नाहीत, त्यावेळी त्यांनी ‘आपण संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहत आहोत, त्यामुळे आपल्याला न्यायालयात हजर राहता येत नाही’, असे कारण दिले. मात्र अधिवेशनाच्या दरम्यान राहुल गांधी हे संभल येथे गेले, तिथे झालेल्या जातीय दंगलीत ४ मुसलमानांचा मृत्यू झाला. त्यामुळे राहुल गांधी तिकडे गेले. या प्रकरणाचे विरोधकांनी भांडवल केले. म्हणून आम्ही न्यायालयात याविषयी अर्ज करून लक्षात आणून दिले आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अधिवेशनाचे कारण देत न्यायालयात येण्याचे टाळले पण याच अधिवेशनाच्या काळात ते संभल येथे गेले, हा न्यायालयाचा अवमान आहे. न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेतला आहे, असे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर म्हणाले.
आता सोमवार, २३ डिसेंबरला राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात परभणी येथे आले. त्यांना महाराष्ट्रात यायला वेळ मिळतो पण वीर सावरकरांच्या बदनामी खटल्यात न्यायालयाने त्यांना सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश देऊनही ते न्यायालयात हजर राहत नाहीत, पण परभणी येथे येतात, हा न्यायालयाच्या अवमान आहे. खरे तर न्यायालयाने याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. आम्ही न्यायालयाच्या ही बाबही निदर्शनास आणून देणार आहोत, असे अधिवक्ता कोल्हटकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community