काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती, त्यावेळी त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली, त्यामुळे ही यात्रा वादात सापडली होती. जेव्हा ही यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद आणि जाहीर सभेत जाणीवपूर्वक वीर सावरकर यांच्यावर पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप केले होते. ज्यामुळे देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात नाराजी पसरली होती. नाशिक येथील वीर सावरकर यांच्या विचारावर चालणाऱ्या निर्भय या संस्थेने राहुल गांधी यांच्या विरोधात नाशिक सत्र न्यायालयात या प्रकरणी खटला दाखल केला आहे. आता या संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र भुताडा हे राहुल गांधी यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात यावे, अशी विनंती ६ जून रोजी न्यायालयात करणार आहेत, अशी माहिती भुताडा याचे वकील मनोज पिंगळे यांनी दिली.
राहुल गांधी यांनी ८ ऑक्टोबर २०२२ आणि १५ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवसांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली होती. त्यावेळी त्यांनी जे आरोप केले होते त्याच्या एकाही आरोपाचा पुरावा राहुल गांधी यांनी दिला नाही. त्यानंतर यासंबंधी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि अन्य माध्यमातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे देवेंद्र भुताडा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात क्रिमिनल ४९९, ५०० आणि ५०४ अशा तीन कलमांखाली नाशिक सत्र न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. या खटल्याच्या सुनावणीचा एक भाग पूर्ण झाला आहे. त्यामध्ये याचिकाकर्ताने दिलेले सर्व पुरावे न्यायालयाने पडताळले आहेत. आता या विषयाची सुनावणी ६ जून रोजी होणार आहे. त्यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात समन्स काढण्याची विनंती याचिकाकर्ता भुताडा न्यायालयाला करणार आहे.
Join Our WhatsApp Community