त्रिनेत्रधारी बाबा भोलेनाथ यांचे केदारनाथ मंदिर राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप खासदार वरूण गांधी (Rahul Gandhi Meets Varun Gandhi) यांनी मंदिराचे दर्शन घेतले. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुटुंबासह बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. यामुळे केदारनाथ सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशातील पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होत असतानाच राजकीय नेते मंदिराला भेटी देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उज्जैनमधील महाकाल मंदिरात नेते मंडळी जाताना दिसत होते. आता बाबा भोलेनाथ यांचे केदारनाथ मंदिर चर्चेत आहे.
(हेही वाचा-Central Railway : प्रवाशांसाठी गर्दीची स्थानके घेणार मोकळा श्वास)
महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी केदारनाथ मंदिरात दीर्घकाळापर्यंत गुफ्तगु केली. उभय नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली? याचा तपशील उपलब्ध नसला तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गांधी कुटुंबाच्या युवराजांमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही असा दावा केला जात आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून वरूण गांधी राजकीय वनवास भोगत आहेत, हे विसरून चालणार नाही हेही तेवढेच खरे आहे. एवढेच नव्हे तर, अलिकडेच अमेठीतील संजय गांधी हॉस्पिटलचे लायसंस रद्द केले होते. यामुळे वरूण गांधी पक्ष आणि सरकारवर बरेच नाराज झाले होते.
दरम्यान, वरूण गांधी यांचा कुटुंबासह केदारनाथला दर्शनासाठी जाण्याची योजना आधीपासून ठरली होती. यानुसार ते पत्नी यामिनी आणि मुलगी अनसूया यांच्यासोबत दर्शनाला गेले होते. दर्शन घेतल्यानंतर माघारी येत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी मंदिरात पोहचले. यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. राहुल गांधी यांनी मुलीसोबत बराच वेळ चर्चा केली. यामिनी यांची सुध्दा विचारपूस केली. मात्र, या काळात दोन्ही बाजूंनी कोणतेही छायाचित्र काढण्याचे टाळले.
राहुल गांधी यांनी मुलगी अनसूयाला शिक्षण आणि छंद याबाबत विचारणा केली. कोणते गेम खेळायला आवडते? हेही विचारले. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर वरुण गांधी कुटुंबासह खाली आलेत. तर राहुल गांधी पुजेसाठी तेथेच थांबले.
महत्वाचे म्हणजे, राहुल गांधी आणि वरूण गांधी यांची ही भेट योगायोगाने झाली की ही भेट योजनाबध्द पध्दतीने घडवून आणण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरूण गांधी काँग्रेसच्या तिकीटवर लढतील अशी चर्चा 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी रंगली होती. तत्पूर्वी यूपी विधानसभेच्या निवडणुकीत वरूण गांधी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशीही चर्चा रंगली होती. आता केदारनाथ येथे झालेल्या या भेटीचे रूपांतर नेमके कशात होते? हे बघावे लागेल.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागच्याच आठवड्यात बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले होते. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, मुलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे तसेच शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर हेही यावेळी उपस्थित होते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community